जळगाव : जिल्हा दूध संघातील लोणी व दूध पावडरच्या चोरी व अपहार प्रकरणी कार्यकारी संचालक यांनी दाखल केलेल्या याचिकेनुसार जिल्हा सत्र न्यायालयाचा अवमान झाला म्हणून तत्कालीन पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, पोलीस उपअधीक्षक राजकुमार चिंथा आणि शहर पोलीस ठाण्याचे सपोनि संदीपसिंग परदेशी, पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकुरवाड यांना न्यायालयाने नोटीस बजावली आहे.
जिल्हा दूध संघामध्ये 14 मेट्रीक टन लोणी व 9 टन दूध पावडरची सुमारे 1 कोटी 15 लाख रुपयांची चोरी व अपहार झाला होता. या विषयाची फिर्याद देण्यासाठी शहर पोलीस ठाण्यासमोर आ.एकनाथराव खडसे यांनी चेअरमन मंदाकिनी खडसे, कार्यकारी संचालक मनोज लिमये यांच्यासह अन्य संचालकांनी ठिय्या आंदोलन केले होते.
अधिकारी व कर्मचार्यांविरुध्द गुन्हा
या आंदोलनानंतरही पोलीसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला नाही. त्यामुळे कार्यकारी संचालकांनी जिल्हा सत्र न्यायालयात संशयित अनंत अशोक अंबिकर, मनोहर नारायण केदार, सुनील चव्हाण यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यासाठी अर्ज केला होता. या अर्जावर निर्णय होण्याआधीच पोलिसांनी पहाटे 3.15 वाजता स्वतः फिर्यादी होवून दूध संघाचे अधिकारी व कर्मचार्यांविरुध्द गुन्हा दाखल केला.
न्यायालयाचा अवमान झाल्याची याचिका दाखल
ही बाब मनोज लिमये यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. न्यायालयाने या प्रकरणात कलम 156 (3) अन्वये गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. न्यायालयाने आदेश देवून देखील पोलिसांनी कार्यकारी संचालक मनोज लिमये यांची फिर्याद घेतली नाही. म्हणून न्यायालयाचा अवमान झाल्याची याचिका मनोज लिमये यांनी दाखल केली होती.
यांना बजावली नोटीस
त्यावर सुनावणीअंती न्यायालयाच अवमान केला म्हणून तत्कालीन पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, पोलीस उपअधीक्षक राजकुमार चिंथा आणि शहर पोलीस ठाण्याचे सपोनि संदीपसिंग परदेशी, पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकुरवाड यांना नोटीस बजावली असल्याचे अॅड. अतुल सूर्यवंशी यांनी कळविले आहे