जळगाव : शिरसोली रोडवरील रायसोनी कॉलेज जवळ अवैध गौणखणीत उत्खनन मोठ्या प्रमाणावर सुरूच आहे. शहरात जवळचे संपूर्ण डोंगर नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. दररोज शेकडो वाहनातून मुरमाचे व दगडांची अवैध वाहतूक केली जात आहे. तहसीलदारांसह प्रशासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. यामागे मोठे अर्थकारण असल्याची वेळ चर्चा होऊ लागली असून, अधिकाऱ्यांच्या मर्जी शिवाय इतके मोठे उत्खनन शक्य नाही. त्यामुळे महसूल प्रशासनासह तहसीलदारही उत्खननाच्या धुळीत रंगल्याचे प्रश्नचिन्ह कायम आहेत. स्थानिक अधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. याची दखल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेऊन चौकशी केल्यास अवैध उत्खननाचे मोठे घबाड समोर येऊ शकते, असे या व्यवसायातील जाणकार यांचे म्हणणे आहे.
शिरसोली रोडवरील रायसोनी कॉलेज जवळ गौण खनिज काढण्याच्या नावाखाली डोंगर फोडून पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्या करण्याचा उद्योग महसूल विभागाच्या आशीर्वादाने सुरू असल्याचे वृत्त ‘राजमुद्रा’ने दिले होते. यामुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे. परंतु याबाबत कारवाई होत नसल्याने ठेकेदाराची पोहोच मोठ्या धेंडांपर्यंत असून यात मोठी आर्थिक देवाण-घेवाण सुरू असल्याची चर्चा महसूलच्या वर्तुळात सुरू आहे.
प्रत्येक गावाची यादी करणे आवश्यक
वास्तविक गौण खनिज उत्खननावर नियंत्रण ठेवण्यासाठी तलाठ्याने त्याच्या कार्यक्षेत्रात प्रत्येक गावी उपलब्ध गौण खनिजाच्या जागा निश्चित करून त्याची यादी जवळ ठेवावी, असा शासकीय नियम आहे. यावरून ज्यावेळेस अधिकारी दौऱ्यावर येतात, त्यावेळी अशा जागांना अधिकारी भेट देऊन अवैध उत्खनास आळा घालण्याच्या दृष्टीने अवैध उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई करता येईल असे अपेक्षित असते. परंतु या गोष्टीकडे दुर्लक्ष केले जात आहे.
लाखो रुपयांचा महसूल बुडतोय
विशेष म्हणजे सूर्यास्तानंतरही अवैध गौणखनीज उत्खननासह वाहतूक सुरू असून या परिसरातून लाखो ब्रास गौण खनिज उत्खनन केले जात आहे. बेकायदा गौण खनिज उपसा होत असल्यामुळे सरकारला लाखो रुपयांच्या महसुलावर पाणी सोडावे लागत आहे. प्रशासन जिल्ह्यात एकीकडे गौण खनिज उत्खनन करणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई करीत असताना, शिरसोली भागात मात्र संबंधितांचे दुर्लक्ष होत आहे.
रात्रीच्या अंधारात केली जाते वाहतूक
प्रशासनातील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांना हाताशी धरून अवैध गौण खनिज उत्खननाचा धंदा सुरू असल्याची चर्चा आहे. या प्रकारामुळे रायसोनी कॉलेज परिसरातील गौण खनिज संपत्ती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. प्रशासनाचे सर्व नियम व कायदे मोडले जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विशेष म्हणजे रात्री देखील गौण खनिज वाहतूक केली जात आहे. या परिसरात गौण खनिज वाहतूक करणारी दररोज 30 ते 40 वाहने आहेत. या वाहनांवर नंबर दिसून येत नाही. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन कठोर कारवाई करण्याची मागणी निसर्गप्रेमी करत आहे.