मुंबई : माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी, बारावी परीक्षेच्या अनुषंगाने तयारी सुरू केली. कोरोनानंतर नियमित परीक्षा होत असल्याने, परीक्षा केंद्र, बैठक व्यवस्थेची मंडळाकडून चाचपणी करण्यात आली. परीक्षेचे संभाव्य वेळापत्रकही जाहीर झाले असताना बोर्डाने परीक्षा पध्दतीबाबत मोठा निर्णय घेतला आहे.
कोरोना प्रादुर्भावामुळे 2021 ची दहावी, बारावी परीक्षा झाली नाही. अंतर्गत मूल्यमापन गुणदान करण्यात आले. 2022मध्ये करोनाचा प्रादुर्भाव कायम होता. परीक्षा घेण्यात आली, परंतु शाळा तेथे केंद्र, 25 टक्के अभ्यासक्रम कमी, अधिकचा वेळ असे बदल मंडळाने केले होते. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने 2023ची परीक्षा 2020मध्ये झाली त्याप्रमाणे घेण्यासाठी मंडळाने तयारी केली आहे.
पूर्वीप्रमाणेच नियम असणार
यंदाच्या एसएससी आणि एचएससी बोर्डाच्या परीक्षा पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये होत आहेत. विद्यार्थ्यांना यंदापासून त्यांच्या शाळेतच त्यांचे परीक्षा केंद्र मिळणार नाही, तसेच कोरोना काळात जो 30 मिनिटांचा अतिरिक्त वेळ दिला जात होता, तो देखील रद्द करण्यात आला आहे. कोरोनापूर्व नियमावली लागू करण्यात येणार असून पूर्वीप्रमाणेच नियम असणार आहेत.
असे आहे संभाव्य वेळापत्रक
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2023 मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 20 मार्च 2023, तर दहावीची परीक्षा 2 मार्च ते 25 मार्च दरम्यान होईल.