जळगाव : जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. ही निवडणूक सर्वच नेत्यांसाठी प्रतिष्ठा पणाला लागली आहे. एकूण 20 जागांसाठी आज सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. निवडणूकीचा दिवस उजाडला असतानाही जळगाव जिल्हा दूध संघाचं राजकारण चांगलचं तापलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे विरूद्ध गिरीष महाजन आणि गुलाबराव पाटील असा वाद रंगला आहे. एकमेकांवर जोरदार आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतानाच आज दूध संघासाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. अशातच एकनाथ खडसे यांनी गिरीष महाजन आणि गुलाबराव पाटील यांना खोक्यावरून टिका केली होती. या टिकेला उत्तर देताना गिरीष महाजनांनी खडसेंवर आरोप केले आहेत.
तुमचा पराभव हा अटळ- महाजन
जळगाव जिल्हा दूध संघात तुम्ही सात वर्षात काय दिवे लावले अशा सवाल कर त्यांनी खडसेंवर निशाणा साधला आहे. दुसऱ्यावर आरोप करून आपण म्हणता खोके वाटले, पेट्या वाटल्या तुम्ही काय आहात हे लोकांना माहिती आहे. तूप खाल्लं, लोणी खाल्लं त्यामुळे आता खडसेंनी पराभवाची कारणे शोधू नये, असा पलटवार महाजनांनी खडसेंवर केला. इतकंच नाही तर, गेल्या सात वर्षात तुम्ही काय दिवे लावलेले सर्व जनतेला माहिती आहे. तुमचे काही लोक तुरुंगात अटकेत आहेत, त्यामुळे तुम्ही आता काही म्हणालात तरी तुमचा पराभव हा अटळ आहे. तुम्हाला दूध संघातून बाहेर काढायचं, हे लोकांनी ठरवलं आहे. असा टोला मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांना लगावला.
मतदार विकासाच्या बाजूने- खडसे
दरम्यान, भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी, जिल्हा दूध संघातील नोकर भरती प्रकरणातील गैरव्यवहाराच्या अनेक ऑडिओ क्लिप माझ्याकडे असल्याचे इशारा एकनाथ खडसेंना दिला होता. त्यावर, माझ्याविरोधातील ऑडिओ क्लिप किंवा काही पुरावे होते तर ते त्यांनी निवडणुकीत लोकांसमोर मांडायला हवे होते. विशेष म्हणजे, मतदार हे सुज्ञ असून ते विकासाच्या बाजूने आहेत. ज्यांनी विकासाची कामे केली..त्यांच्यावर मतदार शिक्कामोर्तब करणार, असल्याचा विश्वास खडसे यांनी व्यक्त केला.