मुंबई: एसी रिपेअरिंग करायला आलेल्या व्यक्तीने 5 वर्षीय मुलीवर इमारतीच्या लिफ्टमध्येच लैंगिक अत्याचार केले आहेत. याप्रकरणी एका 19 वर्षीय व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. नवी मुंबईतील तळोजा पोलीस ठाण्याच्या हद्दीत फेज एकमधील एका इमारती बाहेर ही धक्कादायक घटना घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 19 वर्षीय आरोपीचे नाव अख्तर हुसेन असे असल्याचे चौकशीत पुढे आले आहे. आरोपी एसी दुरुस्त करण्यासाठी इमारतीत आला होता. काम संपवून निघाला असताना इमारतीच्या पार्किंग परिसरात एक चिमुकली एकटीच खेळत असल्याचे त्याच्या दृष्टीस पडली. तिच्या एकटेपणाचा फायदा घेत आरोपीने तिच्यावर अत्याचार केला.
आरोपीला दिले पोलिसांच्या ताब्यात
आरोपीने पीडित चिमुकलीला इमारतीच्या लिफ्टमध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर लिफ्ट तिसऱ्या मजल्यावर नेऊन तिला तिथेच सोडण्यात आले. दरम्यान, पीडिता घरी जाऊन उलट्या करु लागली. सदर प्रकार आईच्या लक्षात आली तेव्हा आईने मुलीकडे विचारणा केली. त्यानंतर पीडितेने घडलेला प्रसंग आईला सांगितला. मुलीने सांगितलेला प्रकार ऐकून आई-वडील घाबरुन गेले. दरम्यान, घडलेला प्रकार काही मिनिटांपूर्वीचा असल्याने आई-वडील धावत बाहेर आले. याच वेळी मुलीनेही आरोपीला पळून जाताना ओळखले. त्यानंतर मुलीचे वडील, सुरक्षारक्षक आणि इमारतीतील नागरिकांनी आरोपीला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले.