जळगाव: जिल्ह्यात होणाऱ्या बेसुमार वाळू वाहतुकीचा खेळ अनेक दिवसापासून राजरोसपणे सुरु आहे. गिरणा नदीपत्रात बेसुमार वाळू उपसा सुरू आहे. या भागातील तहसीलदार असलेले नामदेव पाटील यांना वाळू उपसा रोखण्यात अपयश येत असल्याचे दिसून येत आहे. उघडपणे वाहतूक सुरू असताना यंत्रणेतील काही अधिकारी देखील यामध्ये सहभागी असल्याची चर्चा आहे. त्यामुळे अवैध वाळू वाहतूक रोखण्यात महसूल यंत्रणा सपशेल अपयशी ठरत आहे.
जिल्ह्यात वाळूउपसा जर बंद असेल तर शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी बांधकाम सुरू कशी आहेत, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. दिवसा बांधकामाच्या ठिकाणी वाळू नसते, सकाळी मात्र संबंधित ठिकाणी वाळूचे ढीग कसे दिसतात. याचाच अर्थ वाळूमाफियांनी नदीपात्रात उत्खनन सुरूच ठेवले आहे.
पहाटे जोरात वाहतूक
पहाटे तीन ते पाच या वेळी रस्त्यावर ना महसूलचे अधिकारी, कर्मचारी असतात, ना पोलिस असतात, ना आरटीओचे पथक यामुळे अर्धा तासात जळगावहून निघालेला वाळूचा डंपर इच्छित ठिकाणी पोचतो अन् परत जातोही एवढ्या वेगाने ही वाहने धावतात. ज्या ठिकाणी वाळू टाकायची असते, त्या ठिकाणी दिवसाच डंपरचालक पाहणी करून जातो अन् पहाटे वाळू त्या ठिकाणी पडलेली दिसते.
वाळूचोरीला रोखणार कोण?
वाळूचोरीला महसूल, पोलिस प्रशासन रोखू शकत नाही? मग रोखणार कोण? असा प्रश्न यानिमित्ताने तयार झाला आहे. वाळूचोरी केवळ महसूल, पोलिसांचे काम नाही, तर आरटीओ विभागाचेही काम आहे. प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून काम केले तरच वाळूचोरी शक्य आहे अन्यथा ‘वाळूउपसा बंद’ केवळ कागदोपत्रीच होईल, असे चित्र निर्माण झाले आहे.