धुळे : धुळ्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. थट्टामस्करी करताना काहींनी तरुणाच्या पार्श्वभागात कॉम्प्रेसरचा पाईप टाकून हवा भरली. यात तरुणाचं आतडं फाटलं आहे. गंभीर जखमी झाल्याने तरुणाचा मृत्यू झाला आहे. धुळे जिल्ह्यातील सुजलॉन कंपनीमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. तुषार निकुंभ असे मृत तरुणाचे नाव आहे.
याप्रकरणी संतप्त नातेवाईकांनी निजामपूर पोलीस स्टेशनला घेराव घातला आहे. कंपनीतील दोषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात यावी अशी माणी करण्यात आली आहे. तसेच मयत तुषार निकुंभ याच्या कुटुंबियांना आर्थिक मदतीचे लेखी आश्वासन कंपनीने द्यावे अशी मागणीदेखील कुटुंबियांनी केली आहे. या मगाण्यांसाठी तुषारचे नातेवाईक तसेच छडवेल येथील ग्रामस्थ निजामपूर पोलीस ठाण्यामध्ये आंदोलन केले.
हवेच्या दाबामुळे आतडे फाटले
तुषार निकुंभ आणि हर्षल जाधव हे सुजलॉन कंपनीमध्ये सोबत कामाला होते. कंपनीमध्ये जाताना किंवा येताना कॉम्प्रेसरच्या पाईपने शरीर आणि कपडे स्वच्छ केले जातात. याच पाईप हर्षलने तुषारच्या शौचाच्या जागेमध्ये टाकला आणि त्याच्या शरीरामध्ये हवा भरली. हवेच्या दाबामुळे तुषारच्या शरीरातील आतील आतडे फाटून त्याला गंभीर इजा झाली. त्याला उपचारासाठी सुरुवातीला नंदुरबार आणि तेथून सुरतला हलवण्यात आले.
नातेवाईकांकडून कारवाईची मागणी
उपचारादरम्यानच तुषारचा मृत्यू झाला आहे. त्याच्या मृत्यूनंतर संतप्त ग्रामस्थांनी निजामपूर पोलीस ठाणे गाठले असून, पोलिसांनी योग्य ती कारवाई आणि गुन्हा दाखल केल्याचा दावा अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांनी केला आहे. दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल असे आश्वासनही काळे यांनी दिला आहे.