कानपूर : उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये सपना नावाच्या महिलेने प्रॉपर्टी आणि प्रियकराच्या नादाला लागून पती आणि सासरची फिल्मी स्टाईलमध्ये हत्या केली. सपनाला ही कल्पना टीव्ही सीरियल पाहिल्यानंतर सुचली. यानंतर तिने पती आणि सासऱ्याची हत्या केली. पोलिसांनी सपना आणि तिचा प्रियकर राजसह चार आरोपींना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सपनाने तिचे सासरे किशोर यांना औषधाचा ओव्हरडोज देऊन खून केला होता. यानंतर तिचा प्रियकर राज याने पती ऋषभवर हल्ला करायला लावला. त्यातूनही पती वाचल्यावर औषधाचा ओव्हरडोज देऊन त्याचीही हत्या करण्यात आली. सपनाचा नवरा ऋषभला मधुमेह होता, यासाठी सपनाने ऋषभला ग्लुकोजचे इंजेक्शनही दिले होते. मृत ऋषभच्या मावशीने सांगितले की, ऋषभ घरी नसताना सपनाचा प्रियकर राज अनेकदा घरी यायचा.
पोलिसांची दिशाभूल, शेजाऱ्यालाही गोवले
सपनाच्या षड्यंत्राला बळी पडलेल्या तिचा शेजारी असलेल्या विश्वकर्माची बहीण जया देवी म्हणाली की, जेव्हा सपनाने तिचा पती ऋषभ याच्यावर प्रियकराकडून हल्ला केला होता, तेव्हा तिने पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी माझा भाऊ विश्वकर्मा विरुद्ध तक्रार दिली होती. त्यानंतर माझ्या भावाने हल्ला केल्याचे पोलिसांना सांगितले. या प्रकरणाशी त्याचा काहीही संबंध नसताना पोलिसांनी भावाला पकडून पोलीस ठाण्यात नेले.
एका दगडात दोन पक्षी मारले
सपनाने एका दगडात दोन पक्षी मारले होते. एक म्हणजे एफआयआर नोंदवून तिने स्वतःला वाचवले आणि दुसरे म्हणजे पोलिसांचे लक्ष तिच्याकडे जाऊ नये म्हणून तिने तिच्या प्रियकरालाही वाचवले. सपनाचा शेजारी विश्वकर्मासोबत पैशाच्या व्यवहारावरून वाद सुरू होता.
ऋषभच्या वडिलांनी दत्तक घेतले होते
ऋषभ त्रिपाठीची मावशी शांती देवी यांनीही सांगितले की, ऋषभला त्याचे वडील किशोर यांनी दत्तक घेतले होते. त्याला कुठल्यातरी आश्रमातून आणले होते. त्याला स्वतःची मुले नव्हती. सपनाने आधी माझ्या भावाची हत्या केली, नंतर माझ्या भावाच्या मुलाची हत्या केली. सपनाने ऋषभला औषधांचा ओव्हरडोज देऊन जीवे मारले असा आरोप शांती देवी यांनी केला आहे.
मेडिकल दुकानदारास ओढले जाळ्यात
दुसरीकडे, आशा मेडिकल स्टोअरचा मालक सुरेंद्र हा सपनाला सतत औषधे देत होता. पोलिसांनी सुरेंद्रला अटक केली आहे. सपनानेही सुरेंद्रला आपल्या जाळ्यात अडकवले होते. याप्रकरणी मेडिकल स्टोअरमध्ये काम करणाऱ्या लोकांचे म्हणणे आहे की सपना आमच्याकडून प्रिस्क्रिप्शन दाखवून औषध घेत असे. याची नोंद आमच्याकडे सीसीटीव्हीमध्ये आहे.