नाशिक : खोदकाम करताना सापडलेली सोन्याची नाणी विकायची असल्याचे सांगून दोन व्यक्तीस 10 लाख रुपयांना गंडा घातल्याची घटना सुरगाण्यात घडली आहे. याबाबत दादरा नगर हवेली जिल्ह्यातील सेलवास येथील मुकेश खोंडे (वय 26) यांनी सुरगाणा पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोघा संशयितांना ताब्यात घेतले असून इतर साथीदारांचा शोध सुरू आहे. तसेच या प्रकरणात एक चारचाकी जप्त करण्यात आली आहे.
नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा येथील काही व्यक्तींना खोदकाम करतांना सोन्याची नाणी सापडली असून ती विक्रीला असल्याची माहिती दादरा नगर हवेली येथील मुकेश खोंडे यांना मिळाली होती. त्यानुसार मुकेश खोंडे यांनी दादारा नगर हवेली येथून थेट सुरगाणा गाठून नाणी खरेदीसाठी व्यवहार सुरू केला, त्यात हा व्यवहार 10 लाखांना ठरलाही गेला त्यानुसार 5 हजार रुपयांचा इसारही देण्यात आला.
पोलीस असल्याचे सांगून 10 लाख लुटले
काही दिवसांनंतर ठरलेल्या वेळेत आणि ठिकाणी तक्रारदार मुकेश खोंडे आणि त्यांचे मित्र सुरगाणा येथे आले. विक्रीदारही संबंधित ठिकाणी आले आणि बोलणी सुरू झाली. बोलणी सुरू असतांनाच अचानक एक चारचाकी वाहन आले. आणि व्यवहार सुरू असतांना येऊन थांबले. काय करताय म्हणून विचारणा करत आम्ही पोलीस असल्याची बतावणी दिली आणि 10 लाख रुपये ताब्यात घेऊन पोबारा केला.
आरोपींची कोठडीत रवानगी
यानंतर खोंडे यांनी सुरगाणा पोलीस ठाणे गाठत घडलेला सर्व प्रकार सांगितले. त्यानंतर सुरगाणा पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा यांनी संयुक्तपणे घटनेचे गांर्भीय लक्षात घेत तपास करत संशयित रमेश पवार व कमलाकर गांगुर्डे या दोघा संशयितांना ताब्यात घेतले. दोघा संशयित यांना दिंडोरी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप कोळी हे करीत आहेत.