जळगाव : बोदवड तालुक्यातील पाचदेवळी गावात रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास धक्कादायक घटना घडली आहे. चारीत्र्यावर वारंवार संशय घेणार्या पतीचा पत्नीनेच झोपेत विळ्याचे डोक्यावर सपासप वार करीत खून केला आहे.
या घटनेत दगडू पुंडलिक सुरवाडे (पाचदेवडी, ता.बोदवड) यांचा मृत्यू झाला असून आशा दगडू सुरवाडे असे अटकेतील आरोपी पत्नीचे नाव आहे. या प्रकरणी मयताच्या मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार वरणगाव पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
पती नेहमीच घ्यायचा संशय
बोदवड तालुक्यातील पाचदेवळी गावात बौद्धवाडा भागात दगडू पुंडलिक सुरवाडे हे शेतकरी पत्नी आशा, मुलगी रोशनी (वय-१७) सह वास्तव्याला होते. सुरवाडे यांना दारूचे व्यसन असल्याने ते पत्नी आशा यांच्या चारीत्र्यावर संशय घेत नेहमीच वाद करीत असल्याने त्यास कुटुंब वैतागले होते. रविवारी सायंकाळीदेखील दगडू सुरवाडे हे शेतातून आल्यानंतर गावात गेले व मद्यप्राशन करून घरी परतले मात्र पुन्हा त्यांनी पत्नीच्या चारीत्र्यावर संशय घेत वाद उकरून काढला.
डोक्यावर केले सपासप वार
घरात जेवण केल्यावर सुरवाडे झोपी गेले. मनात राग असल्याने आशा सुरवाडे यांनी घरातील धारदार विळा काढून दगडू सुरवाडे यांच्या डोक्यावर सपासप वार करण्यास सुरूवात केली. घरात आरडा-ओरड होत असल्याचे पाहून गल्लीतील नागरीक जमा झाले तसेच मुलगी रोशनी देखील पोहोचली.
मुलीने दिली आईविरोधात फिर्याद
मुलगी रोशनी हिने आई आशाबाई यांना किचनमध्ये नेत बसवून ठेवले व वरणगाव पोलिसांना माहिती कळवल्यानंतर पोलिसांनी धाव घेत आशाबाई सुरवाडे यांना अटक केली. रोशनी यांच्या तक्रारीवरून वडिलांच्या खून केल्याप्रकरणी आई आशाबाई सुरवाडे विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली. तपास सहा.निरीक्षक आशिषकुमार अडसुळ व सहकारी करीत आहेत.