जळगाव: जळगाव शहरासह जिल्ह्यात पाच ठिकाणी आयकर विभागाची छापेमारी सुरु झाल्याने खळबळ उडाली आहे. शहरातील एका वाहन शोरुमध्ये आयकरने छापा टाकला असून, इतरही राजकीय नेत्यांचे व्यवहार तपासले जात असल्याची माहिती सुत्रांकडून समोर आली आहे.
आयकर विभागाने जळगाव शहरासह जिल्ह्यात अचानकपणे छापेमारी सुरु केल्याने व्यापारी तसेच राजकीय गोटात खळबळ उडाली आहे. यात काही बडे मासे अडकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यात विदेशातून फंडींग होत असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या कारवाईतून अनेक धागेदोरे हाती लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
पीएफआयच्या हस्तकास झाली होती अटक
राष्ट्रीय गुप्तचर तपास यंत्रणेच्या (एनआयए) वतीने जळगावातील मेहरुण परिसरातून पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या संघटनेशी संबंधित असल्यावरुन एका संशयितास अकोल्याच्या दहशतवादविरोधी पथकाने ताब्यात घेतले होते. दहशतवादी क़ृत्यांसाठी निधीप्रकरणी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या संघटनेशी संबंधित कार्यालय, व्यक्ती आणि महत्त्वपूर्ण ठिकाणांवर एनआयए आणि स्थानिक पोलिसांच्या पथकाने छापे टाकले होते. या कारवाईत जळगाव येथून एकाला अटक करण्यात आली होती. यानंतर आता आयकर विभागाने छापेमारी सुरु केली आहे.