मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. पवार यांच्या मुंबई येथील सिल्व्हर ओक या घरी अज्ञात व्यक्तीने फोन करून पवार यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. या व्यक्तीचा शोध लागला असून, मुंबई पोलीस लवकरच त्याला ताब्यात घेणार आहे.
शरद पवारांचा काल (सोमवारी, 12 डिसेंबर) वाढदिवस झाला. वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी पवारांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. मुंबईतील शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक येथील घरी एका अज्ञात व्यक्तिचा फोन आला. मुंबईत येऊन देशी बनावटीच्या पिस्तुलानं ठार मारणार असल्याचं धमकी देणाऱ्या अज्ञात व्यक्तिनं फोनवर म्हटलं आहे. धमकी देणारी व्यक्ती हिंदीत बोलत होती.
धमकी देणाऱ्या व्यक्तीचा लागला शोध
धमकी दिल्यानंतर सध्या बंगल्यावर तैनात असलेल्या पोलीस ऑपरेटरच्या तक्रारीवरून गावदेवी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत आहेत. मुंबई पोलीसांनी तक्रारीनंतर गुन्ह्याचा तपास सुरू केला आहे. त्यामध्ये शरद पवार यांना धमकी देणाऱ्या व्यक्तीचा पोलिसांनी शोध लागला आहे.
मुंबई पोलीस लवकरच ताब्यात घेणार
मुंबई पोलिसांच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवार यांना धमकी देणारी व्यक्ती बिहारमधील रहिवासी आहे. गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून तो सतत फोन करून धमक्या देत होता. बिहारमधून धमकी देणाऱ्या व्यक्तीला मुंबई पोलीस लवकरच ताब्यात घेणार असून उद्यापर्यंत मुंबईत आणणार असल्याची माहिती समोर येत आहे.