जळगाव: जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत शिंदे भाजप गटाचे ना. गुलाबराव पाटील आणि ना. गिरीश महाजन यांच्या शेतकरी विकास पॅनलने बाजी मारली. दूध संघात गेली सात वर्षे सत्ता उपभोगणाऱ्या एकनाथ खडसे गटाचा दारुण पराभव झाला. निकालानंतर विजयी उमेदवारांनी जल्लोष साजरा केला. तर पराभूत उमेदवार हे चिंतन करीत आहेत. या निवडणुकीत मंत्री गिरीश महाजन यांनी आखलेली रणनिती यशस्वी ठरली आहे.
सन 2015 मध्ये आ. एकनाथराव खडसे हे भाजपामध्ये असतांना त्यांनी सर्वपक्षीय पॅनलची संकल्पना मांडून दूध संघावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते. याच काळात जिल्हा बँकेवरही कन्या अॅड. रोहिणी खडसे यांच्या रूपाने सत्ता कायम ठेवली होती. मात्र वर्षभरापूर्वी आ. खडसे यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि जिल्ह्यातील सत्तासमीकरणेही बदलली.
राजकीय दुश्मनीनेच खडसेंचा घात
राज्यातील सत्ता परिवर्तनाने जिल्ह्यातील गुलाबराव पाटील, गिरीश महाजन विरूध्द एकनाथराव खडसे ही राजकीय दुश्मनी अधिकच घट्ट केली. या राजकीय दुश्मनीनेच राष्ट्रवादीच्या आ. खडसेंचा दूध संघाच्या निवडणूकीत घात केला.
सर्वपक्षीय पॅनलची खेळी
निवडणूक जाहीर झाल्यावर सुरुवातीला सहकारात राजकारण असायला नको, म्हणून सर्वपक्षीय पॅनल तयार करून निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन दोन्ही गटाकडून करण्यात आले. खडसे परिवाराला वगळून सर्वपक्षीय पॅनल करण्यात यावी, अशी मागणी शिंदे गटाकडून करण्यात आली. महाजनांनी ही खेळी केली.
नियम बदलाचा भाजपला फायदा
दूध संघ निवडणुकीची नियमावली ऐनवेळी बदलली गेली. तालुक्याचे बंधन काढून जिल्हा मतदार संघ करण्यात आला आणि ते शिंदे भाजप गटाच्या पथ्यावर पडले. या बदललेल्या नियमावलीमुळे चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण हे मुक्ताईनगर मतदारसंघातून मंदाकिनी खडसेंच्या विरोधात निवडणूक लढवू शकले.
जिसकी लाठी उसकी भैस
जळगाव जिल्हा दूध संघ निवडणुकीत अर्ज माघारीनंतर लावण्यात आलेली स्थगितीही उठवली गेली. त्याचाही फटका खडसे गटाच्या पॅनलला बसला, असे म्हणता येईल. म्हणजे ‘जिसकी लाठी उसकी भैस’, या म्हणीप्रमाणे जे सत्तेत आहेत त्या शिंदे भाजप गटाने दूध संघ निवडणुकीच्या संदर्भात आपल्या हाती असलेल्या सत्तेचा वापर केला. हेच आधी जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत एकनाथ खडसेंनी सत्तेचे कार्ड करून गिरीश महाजनांना जेरीस आणले होते.
गिरीश महाजनांनी काढला वचपा
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत गुलाबराव पाटील, एकनाथराव खडसे एकत्र होते. त्यावेळी परिस्थिती पाहून गिरीश महाजन यांनी भाजपतर्फे जिल्हा बँक निवडणुकीतून माघार घेतली होती. त्यामुळे जामनेर मधून खडसे गटाचा उमेदवार बिनविरोध विजयी झाला होता. त्या वेळेचा वचपा आता दूध संघात गिरीश महाजन यांनी काढला. एकनाथ खडसेंच्या ताब्यात असलेला दूध संघ त्यांच्या बालेकिल्ल्यातून हिसकावून घेतला.