जळगाव (राजमुद्रा): शहरापासून जवळच असलेल्या निमखेडी शिवारात मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा होत आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात वाळूचे ठिय्ये साठवले जात आहे. एवढेच नाही या सर्व कारभाराला पोलीस यंत्रणेतील विभागाचे प्रमुख व कर्मचारी यांच्या पाठबळाने बेकायदेशीर कारभार सुरू असल्याचे समोर आले आहे.
जिल्ह्यात वाळू उपशावर बंदी असतानाही शहर व परिसरात अवैध वाळू वाहतूक सुरूच असून वाळू वाहतूकदारांकडून नदी पात्र अक्षरश: ओरबडले जात आहे. सोबतच ठिकठिकाणी साठवून ठेवलेल्या वाळू साठ्यांमधूनही वाळूची चोरी होत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. महसूल विभागाकडून देखरेख ठेवल्याचे सांगितले जाते. तरीही वाळूची चोरटी वाहतूक सुरुच असल्याचे दिसून येते. मुळात खरोखर पथकाकडून कारवाई केली जाते की केवळ सोपस्कार म्हणून पाहणी होत आहे, असाही सवाल उपस्थित केला जात आहे.
वाळू उपशासाठी वाहनांची जत्रा
कोणीही वाळू गटातून वाळूचा उपसा करू शकत नाही. असे असले तरी दररोज मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा होत असल्याचे चित्र आहे. गिरणा नदीपात्रात तर पहाटे तीन वाजेपासून वाळू उपशासाठी वाहनांची जत्राच भरल्याचे दिसून येते. इतकेच नव्हे या ठिकाणी वाहनांच्या चाकांचे निशाण मोठ्या प्रमाणात पहावयास मिळत आहे. त्यामुळे त्यावरूनच उपशाचा अंदाज येतो. निमखेडी भागातून सर्रासपणे वाळू उपसा सुरु आहे. ही वाहतूक रात्रीच्या वेळी तर मोठ्या प्रमाणात होतेच सोबतच आता दिवसाही वाळूची वाहने वाळू भरुन नेत असल्याचे दिसून येते.
या ठिकाणी आहेत वाळूचे साठे
रात्रीच्या पेट्रोलिंग वर असणारे पोलीस मात्र या सर्व प्रकरणाकडे दुर्लक्ष करून आहेत. यंत्रणा पोखरल्या गेल्याने गिरणा नदी पात्राचे लक्तरे तोडले जात आहे. कचरा फॅक्टरी, पाणी पाऊच फॅक्टरी, राष्ट्रीय महामार्ग परिसर, पठाण बाबा दर्गा या परिसरात मोठ्या प्रमाणात वाळूचे साठे करण्यात आले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज
जिल्ह्यातील नद्यांमधील अमर्याद वाळूचा उपसा मक्तेदारांनी केला आहे. गिरणा नदीतील सर्वच भागांतील वाळू संपली आहे. जळगाव शहरालागत गिरणा नदीतून तर अमर्याद वाळूचा उपसा करण्यात आला आहे. अगदी नदीवरील पुलाच्या पिलरजवळील वाळूही उपसण्यात आली आहे. त्यामुळे पीलर उघडे पडले आहेत. भविष्यात पुलाला धोका निर्माण होण्याचीही शक्यता आहे. जिल्ह्यातील वाळूउपशाची ही गंभीर स्थिती लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे विशेष लक्ष देऊन कडक कारवाई करण्याची गरज आहे.