पुणे : शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी हिंदू देवीदेवतांबद्दल केलेल्या विधानामुळे अडचणीत सापडल्या आहेत. सुषमा अंधारे यांची पक्षातून हकालपट्टी करा अशी मागणी वारकरी संप्रदायाने केली आहे. तसेच आळंदीत त्यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. संत आणि देवतांची विडंबन केल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी आळंदीतील साईबाबा वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष ह.भ.प. महेश महाराज मडके पाटील यांनी आळंदी पोलीस ठाण्यात निवेदनाद्वारे केली आहे.
शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी काही दिवसांपूर्वी वारकरी संप्रदायातील आणि संत मांदियाळीतील थोर संत ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज आणि एकनाथ महाराज यांच्यावर सहेतूक विकृत टीकात्मक विडंबन केले होते. तसेच त्यांनी उपास्य दैवत प्रभू रामचंद्र आणि श्रीकृष्ण भगवंत यांच्यावर देखील टीका केली आहे. या वक्तव्यावरुन आळंदीतील युवा कीर्तनकार महेश महाराज मडके पाटील महाराज चांगलेच आक्रमक झाले. त्यांनी सुषमा अंधारे यांचा निषेध करण्यासाठी त्यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली. तसेच त्यांच्या प्रतिमेस चपलांचा हार घातला होता.
पोलीस ठाण्यापर्यंत प्रतिकात्मक अंत्ययात्रा
आळंदीत साईबाबा वारकरी शिक्षण संस्थेच्या प्रांगणापासून आळंदी पोलीस ठाण्यापर्यंत सुषमा अंधारे यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून आळंदीत वारकऱ्यांकडून निषेध करण्यात आला. तसेच ”सुषमा अंधारे ज्या पक्षात असेल त्या पक्षाला मतदान करणार नाही” अशी शपथ ठिकठिकाणी वारकऱ्यांनी घेतली आहे.
महाराष्ट्राला शेकडो वर्षांची वारकरी परंपरा ही केवळ संतांच्या विचाराची सेवा आहे. भागवत धर्माची उभारणी करणाऱ्या संतांचे असे विकृत टीकात्मक विडंबन करणे निषेधार्ह आहे. त्यामुळे सुषमा अंधारे यांच्यावर गुन्हा दाखल करून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
सुषमा अंधारेंनी मागितली माफी
सुषमा अंधारे यांनी सच्च्या वारकऱ्यांच्या भावना दुखावल्या असतील तर माफी मागते, असं वक्तव्य केले आहे. पण भाजप पुरस्कृत वारकरी आघाडीकडूनच बदनामी केली जात असल्याचा आरोपही सुषमा अंधारेंनी केला आहे. कोरोनामुळे जेव्हा मंदिरं बंद ठेवण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतला. तेव्हा या निर्णयाला विरोध करणारा हा तुषार भोसले यांचा कंपू होता, अशी टीकाही त्यांनी केली. वारकऱ्यांबाबतचा व्हिडिओ हा 2009 मधला असल्याचे अंधारेंनी स्पष्ट केले आहे. हे व्हिडिओ व्हायरल करुन बदनामी करण्याचे भाजप आघाडीचं षडयंत्र असल्याचा आरोपही त्यांनी केला.