नागपूर : नागपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून खुनाच्या घटना वाढल्या आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. यातच आता आणखी एक धक्कादायक घटना नागपूरमधून उघडकीस आली आहे. आईसोबत असलेल्या अनैतिक संबंधाची माहिती मिळाल्याने संतप्त झालेल्या मुलाने आईच्या प्रियकराची हत्या केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही खळबळजनक घटना नागपुरातील शांतीनगर म्हाडा कॉलनी परिसरात घडली आहे. भरवस्तीत एका व्यक्तीची हत्या करण्यात आली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. सुदर्शन कावडे असे मृत व्यक्तीचे नाव आहे. सुदर्शन हा इलेक्ट्रिशियचे काम करायचा. दुचाकीने घरी जात असताना सुदर्शनवर दोन हल्लेखोरांनी तीक्ष्ण हत्यारांनी वार केले. तसेच हल्ला केल्यावर ते पळून गेले. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असता ही धक्कादायक माहिती समोर आली.
पोलिसांनी आरोपींना केली अटक
तसेच या प्रकरणात दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे आणि या आरोपींनी त्यांनी केलेल्या गुन्ह्याची कबूली दिली आहे. आरोपीच्या आईचे मृत व्यक्तीसोबत अनैतिक संबंध होते. त्यामुळे त्याचा राग मनात ठेवून आरोपी शुभम आणि आपला साथीदार शुभमच्या मदतीने सुदर्शनची हत्या केली. याप्रकरणी शांतीनगर पोलीस अधिक तपास करत आहेत.