मुंबई : बऱ्याचवेळा काही तांत्रिक बाबींमुळे चुकीच्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर झाल्याचे प्रकार समोर येतात. आपल्या बँक खात्यात अचानकपणे लाखो रुपये आल्यास आनंद गगनात मावेनासा होईल. लागलीच हे पैसे कुठे खर्च करावे याचाही विचार सुरू होईल. बँकेला याची माहिती देण्यापेक्षा अनेकजण हे पैसे खर्च करण्यावर भर देतात. मात्र, हे पैसे खर्च केल्यास तुम्हाला तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. ऑस्ट्रेलियात एका रॅपरला 18 महिन्याच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
ऑस्ट्रेलियातील 24 वर्षीय रॅपर अब्देल घाडिया याच्या बँक खात्यात अचानकपणे 4,20,000 पौंड म्हणजे जवळपास 4.26 कोटी रुपये जमा झाले. अब्देल घाडिया याने बँक खात्यात आलेली रक्कम कोणताही विचार न करता खर्च करण्यास सुरुवात केली. अब्देलने यातील बहुतांशी रक्कम स्वत:साठी खर्च केली. त्याने जवळपास 4 कोटींचे सोने खरेदी केले. तर, उरलेल्या इतर रक्कमेतून ब्रॅण्डेड कपडे, बिटकॉईन, फॅशन प्रोडक्ट्स आदींवर खर्च केले. या उतावीळपणाची शिक्षा त्याला मिळालीदेखील आहे.
पैसे कोणाचे होते?
वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, एका दाम्पत्याची ही रक्कम आहे. हे दोघेही घर खरेदी करण्यासाठी एका रिअल इस्टेट ब्रोकरसोबत ई-मेलवरून संवाद साधत होते. त्याच वेळेस त्याचा ई-मेल आयडी हॅक झाला आणि घर खरेदीची रक्कम घाडिया याच्या बँक खात्यात ट्रान्सफर झाली. मागील वर्षी ही घटना घडली होती.
कोर्टाने सुनावणी 18 महिन्याची शिक्षा
पोलिसांमध्ये तक्रार केल्यानंतर याचा तपास करण्यात आला होता. घाडिया हा गुन्ह्यातील रक्कम हाताळणे, खर्च करणे या गुन्ह्यात दोषी आढळला. मात्र, ही रक्कम आपण खर्च केली असल्याचे त्याने मान्य केले. कोर्टाने घाडियाला 18 महिन्याची शिक्षा सुनावली आहे. घाडियाने पोलिसांना दिलेल्या जबावात म्हटले की, मी सकाळी झोपेतून उठल्यानंतर माझ्या बँक खात्यात मोठी रक्कम वळती झाली असल्याचे दिसून आले. त्यानंतर मी त्यातून सोने खरेदी केले. मात्र, कोर्टाने घाडियाला पूर्णपणे निर्दोष समजता येणार नसल्याचे सांगत शिक्षा सुनावली.
बँकेत अचानक पैसे आल्यास काय कराल?
कधी तांत्रिक बिघाड तर कधी चुकून दुसऱ्याचे पैसे तुमच्या बँक खात्यात वळते होतात. तुम्हाला माहित नसलेल्या व्यवहारातून तुमच्या खात्यात पैसे जमा झाल्यास तुमच्या बँकेला याची कल्पना द्या. ही रक्कम खर्च करू नका. तुमच्या खात्यात कोणाकडून पैसे आले, याचा शोध बँकेकडून घेतला जाईल आणि ही रक्कम योग्य व्यक्तिच्या हाती सोपवली जाईल. जर तुम्ही ते पैसे काढून खर्च केले तर तुम्ही संकटाला आमंत्रण देता.