जळगाव : घरकुल घोटाळा प्रकरणात नियमित जामीन मंजूर झाल्यानंतर तब्बल पाच वर्षांनंतर माजी आमदार सुरेश जैन मुंबई येथून जळगावात पोहचले. रात्री साडेनऊला राजधानी एक्सप्रेसने जळगाव रेल्वेस्थानकावर आगमन होताच शेकडो शिवसैनिकांनी आणि त्यांच्या चाहत्यांनी ढोलताशे वाजवून व फुले उधळून त्यांचे जोरदार स्वागत केले. त्यांच्या आगमनामुळे जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाला बळ मिळाले आहे. असे असताना शिंदे गटाचे नेते पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सुरेश जैन यांच्या निवासस्थानी जावून भेट घेतली.
सुरेशदादा जैन यांनी राजकारणात राहून वेळोवेळी मार्गदर्शन केले आहे. परंतु, आता त्यांनी राजकारणात यावे की नाही हा त्यांचा व्यक्तीगत विषय आहे. परंतु, माझ्या मतानुसार जैन यांनी राजकारणात येवून पुन्हा मैदानात उतरावे. दादांचे बोट पकडून आम्ही राजकारणात आलो. अनेक वर्षानंतर त्यांचे जळगावात आगमन झाले. त्यांना आजवर जनतेसाठी वेळ दिला आहे. आता आपल्या कुटूंबीयांसाठी वेळ देणार असल्याचे सांगितले. त्यांनी आता आमच्याकडेही लक्ष द्यावे, आमच्याकडून ज्या काही चुका होतील, त्या दुरुस्त करण्यासाठी मार्गदर्शन करावे. जळगाव शहराच्या विकासासाठी आम्हाला सहकार्य करावे, अशी अपेक्षा गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली.
राजकारणात सक्रिय होण्याचा विचार नाही
सुरेश जैन यावेळी म्हणाले, जळगावकरांचे प्रेम पाहून सांगण्यासाठी माझ्याकडे शब्द उरलेले नाहीत. मागील ४० वर्षांपासून राजकारणात आहे. मात्र, असे स्वागत आणि एवढी गर्दी मी आतापर्यंत अनुभवली नव्हती. मी घरी आल्यानंतर देवाचे दर्शन घेतले. माताजींचा आशीर्वाद घेतला आणि ‘जळगावकरांचे भले होवो’, हीच इच्छा व्यक्त केली. मी अद्याप राजकारणात सक्रिय होण्याचा विचार केलेला नाही. पक्षाचा मार्गदर्शक म्हणूनच आपण काम करणार असल्याचा विचार केला आहे. मात्र, जळगावकरांचे प्रेम पाहून, तसेच घरच्यांशी चर्चा करून आपण राजकारणात येण्याबाबत पुढे निर्णय घेऊ, असे सांगितले.
राजकारणात येण्यास घरच्यांचा विरोध
गेली ४० वर्षे आपल्या परीने चांगले काम केले आहे. मात्र, दुर्दैवाने सध्या जळगाव खड्ड्यांचे शहर आहे, असे म्हटले जाते. याचे मला वाईट वाटते. आता विकासाकडे लक्ष घालू. विकास जादूची कांडी नाही. मात्र, तो निश्चित होईल. राजकारणात येण्यास आपल्याला घरच्यांचा विरोध आहे. मात्र, आपण त्यांच्याशी चर्चा करून पुढील निर्णय घेऊ, असेही जैन म्हणाले.