मुंबई : भारतीय रेल्वेची उपकंपनी असलेल्या इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनमधील (IRCTC) 5 टक्के हिस्सा केंद्र सरकार विकणार आहे. शेअर बाजारात ऑफर फॉर सेलद्वारे (OFS) गुरुवारी आणि शुक्रवारी शेअर्सची विक्री केली जाणार आहे. केंद्र सरकारने IRCTC चे शेअर्स विकण्यासाठी 680 रुपये प्रति शेअर इतकी फ्लोअर प्राईस निश्चित केली आहे.
बुधवारी IRCTC चे शेअर्स 1.67 टक्क्यांनी वाढून 734.90 रुपयांवर स्थिरावला. म्हणजेच सरकार बुधवारच्या बंद किंमतीपासून IRCTC चे शेअर्स 7 टक्क्यांच्या सवलतीने गुंतवणूकदारांना विक्री करणार आहे. मात्र, गुरुवारी IRCTC च्या शेअर दरात 5 टक्क्यांची घसरण दिसून आली. हा शेअर 697.70 रुपयांवर व्यवहार करत होता. जवळपास 4 कोटी शेअर्स ऑफर फॉर सेलमध्ये उपलब्ध होतील. किरकोळ गुंतवणूकदार शुक्रवारी या शेअर्ससाठी बोली लावू शकणार आहेत.
3 वर्षात दिले 1000 टक्क्यांचे रिटर्न
IRCTC चा IPO सप्टेंबर 2019 मध्ये आला होता. या आयपीओला गुंतवणूकदारांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. आयपीओत IRCTC ने 320 रुपये प्रति शेअर इतकी किंमत निश्चित केली होती. हा स्टॉक 14 ऑक्टोबर 2019 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध झाला. तेव्हापासून या शेअरच्या दरात तेजी दिसून आली आहे. गुंतवणूकदारांना IRCTC ने तीन वर्षात 1048 टक्क्यांचा परतावा दिला आहे.
सरकार कमी करतेय हिस्सेदारी
IRCTC ही भारतीय रेल्वेची उपकंपनी आहे. IRCTC च्या वेबपोर्टलच्या माध्यमातून रेल्वे तिकीट बुकिंग करता येते. त्याशिवाय, IRCTC च्या माध्यमातून काही विशेष टुरिस्ट ट्रेनही चालवण्यात येतात. IRCTC च्या मार्फत लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये खानपान सेवा पुरवण्यात येते. केंद्र सरकारकडून IRCTC मधील आपला समभाग कमी केला जात आहे. 2019 मध्ये IPO आल्यानंतर सरकारचा हिस्सा 87.40 टक्क्यांवर आला होता. यानंतर, सरकारने पुन्हा 20 टक्के हिस्सा विकला. सध्या भारत सरकारकडे IRCTC ची 67.40 टक्क्यांची हिस्सेदारी आहे. विक्रीसाठी ही ऑफर पूर्ण झाल्यानंतर, सरकारची IRCTC मधील हिस्सेदारी 62.40 टक्क्यांपर्यंत खाली येईल.