जळगाव: जिल्ह्यात अवैध वाळू उपशामुळे हजारो हेक्टर शेती उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. या भागातील वाळू उपशामुळे नांद्रा, आव्हाने, खेडी, वडनगरी, कानळदा याभागातील मोठ्या प्रमाणात शेती उद्धवस्त होण्याच्या मार्गावर आहे.
मोठ्या प्रमाणात जलपातळी खालावत असून यामुळे शेतीप्रधान असलेला परिसर उध्वस्त होण्याच्या मार्गावर आला आहे. शासन आणि प्रशासन याबाबत मात्र झोपेचे सोंग घेऊन आहे.
पर्यावरणाचा ऱ्हास
या भागातून केळीचे उत्पादन होत असताना जळगाव जिल्हा हा केळी उत्पादनाच्या बाबतीत जगभरात प्रसिद्ध आहे. मात्र याकडे जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांचा दुर्लक्ष होत आहे. कारण यामध्ये मोठ्या प्रमाणात वाळू वाहतुकीत भ्रष्टाचार केला जात आहे. जिल्ह्यात अति वाळूउपसा, वाळूचोरी यांमुळे पर्यावरणाचा ऱ्हास झाला आहे. शेतरस्ते खराब झाले असून, नदीकाठची शेती जलसाठे घटल्याने उजाड झाली आहे.
नदीकाठच्या विहिरी कोरड्याठाक
जिल्ह्यात तापी, गिरणा नदीतून मागील २५ ते ३० वर्षे वाळूचा बेसुमार उपसा झाला आहे. गिरणा नदीत जळगाव, पाचोरा, भडगाव, धरणगाव, चाळीसगाव भागांत तर तापी नदीत यावल, जळगाव, अमळनेर, चोपडा भागांत मोठे खड्डे पडले आहेत. हे खड्डे २५ ते ३० फुटाचे आहेत. त्यात अनेक शेतकरी, बालकांना जीव गमवावा लागला आहे. नदीतील वाळू संपत आल्याने पाण्याचा निचरा होत नाही. पाणी वाहून जाते. नदीकाठच्या विहिरी जानेवारीतच कोरड्या होतात. हा प्रकार सर्वत्र घडत आहे.
वाळू वाहतुकीमुळे रस्त्यांची लागली वाट
वाळू वाहतूक सतत सुरूच राहिल्याने तापी, गिरणाकाठचे अनेक शेतरस्ते, डांबरी रस्ते खराब झाले आहेत. ते वर्षानुवर्षे दुरुस्त केले जात नाही. शासन फक्त महसूल शोधते. या प्रकाराबाबत कुणी गांभीर्याने कारवाई करीत नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. आता वाळूची चोरी, अवैध वाहतूक सर्रास सुरू आहे. वाळूमाफियांनी अक्षरश: धुडगूस घातला असून, महसूल प्रशासनातील अधिकाऱ्यांवर हल्ले करण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे.