नागपूर : आगामी काळात मुंबई महापालिकेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. या निवडणुकीपूर्वी डॉन अरुण गवळीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातून दिलासा मिळाला आहे. काही दिवसांपूर्वी मुलाच्या लग्नानिमित्त मिळालेल्या अभिवचन रजा (पॅरोल) उपभोगून आलेल्या गवळीला नागपूर खंडपीठाने आता संचित रजा (फरलो) देखील मंजूर केली आहे.
अरुण गवळीला त्याच्या पात्रतेनुसार व आवश्यक अटींसह संचित रजा देण्यात याव्या आणि त्याला या निर्णयाची प्रत मिळाल्यापासून एक आठवड्यात सोडण्यात यावे, असे न्यायालयाने सांगितले.
उच्च न्यायालयात घेतली धाव
कारागृह विभागाचे उपनिरीक्षकांनी त्याचा अर्ज फेटाळल्याने त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणी न्यायमूर्ती सुनील शुक्रे आणि न्यायमूर्ती महेंद्र चांदवाणी यांच्या समक्ष सुनावणी झाली. रजा मंजूर केल्यास गवळी मुंबई महापालिका प्रभावित करु शकतो, कारणावरुन कारागृह या अरुण गवळी विभागाचे उपनिरीक्षक (पूर्व) यांनी गवळीचा संचित रजेचा अर्ज नामंजूर केला होता. त्यामुळे, त्याने उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली होती. मात्र, ठोस पुरावे सादर न केल्यामुळे संबंधित कारण काल्पनिक असल्याचे मत न्यायालयाने व्यक्त केले.
खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा
गवळीला शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. तो नागपूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहे. गवळीतर्फे विधीज्ञ मीर नगमान अली यांनी कामकाज पाहिले.