यावल : तालुक्यातील बोरावल बुद्रुक शेतामध्ये निंदणी करणाऱ्या महिलेस गावठी बनावटीचा हातबॉम्ब सापडला. ही वस्तू काय आहे हे पाहण्यासाठी बॉम्ब हातात घेताच तो फुटल्याने या घटनेत महिला गंभीर जखमी झाली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून, जखमी महिलेवर यावल ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून तिला जळगावी हलवण्यात आले आहे.
यावल तालुक्यातील बोरावल बुद्रुक शिवारात तापी नदीच्या किनारी नरेश लक्ष्मण जावळे (रा.राजोरा) या शेतकऱ्याचे शेत असून या शेतात त्यांनी हरभरा पेरणी केली आहे. हरभऱ्याच्या शेतात महिला मजुर निंदणी करीत असताना बेबाबाई पंडित सोनवणे (वय ५५, रा.राजोरा) या महिलेला एक गोळा आढळला. ही वस्तू पाहण्यासाठी महिलेने खुरपीच्या साह्याने छेडछाड केल्याने त्याचा स्फोट झाला. त्यात बेबाबाई सोनवणे यांच्या डाव्या हाताला जबर दुखापत झाली. या अपघातात त्यांच्या हाताची दोन बोटं तुटली आहेत. ब्लास्टनंतर शेतातील मजुरी करणाऱ्या महिला या सैरावैरा पळाल्या.
महिलेची प्रकृती गंभीर
शेतकरी नरेश जावळे यांनी जखमी अवस्थेतील महिलेला तातडीने तेथून यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारार्थ दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ.शिवदास चव्हाण, अधिपपरीचारीका मनीषा धांडे, नेपाली भोळे, सुमन राऊत, अमोल अडकमोल आदींनी त्यांच्यावर प्रथमोपचार केले व त्यांना तातडीने पुढील उपचारार्थ जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवले. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरिक्षक राकेश मानगावकर, उपनिरीक्षक प्रदीप बोरूडे पथकासह घटनास्थळी दाखल झाले.
शिकारीचा संशय
शेतासह परीसरात फासेपारधींकडून रानडुकरांच्या शिकारीसाठी अशा पद्धतीने गावठी बनावटीचे हात बॉम्ब बनवून जमिनीत पुरले जातात. शेत मशागतीत हा बॉम्ब जमिनीत गाडला गेल्याचा अंदाज असून महिलेने त्यास स्पर्श करून छेछाड केल्याने त्याचा ब्लास्ट झाल्याचे शेतकरी नरेश भंगाळे म्हणाले.