जळगाव: सुरेशदादा जैन घरकुल गैरव्यवहारात नियमित जामीन मिळाल्यानंतर ते जळगावात आले आहेत. त्यांना भेटण्यासाठी जिल्ह्यातील राजकीय नेत्यांची रिघ लागली आहे. आज राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी सुरेशदादा जैन यांच्या शिवाजीनगरातील निवासस्थानी भेट घेतली. त्यांनी जैन यांना पुष्पगुच्छ देवून त्यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी त्यांच्यासोबत आमदार मंगेश चव्हाण उपस्थित होते.
या भेटीनंतर पत्रकारांनी सुरेशदादा यांच्यासोबत पक्षात येण्यासंदर्भात काही चर्चा झाली का? असे विचारले असता गिरीश महाजन म्हणाले, दादा जळगावला आल्याने सदिच्छा भेट दिली. या भेटीचा राजकारणाशी कुठलाही संबंध नाही. दादा आणि आमचे कौटुंबिक जिव्हाळ्याचे संबंध आहेत, हे सर्व महाराष्ट्राला माहिती आहे, या भेटीत पक्षासंदर्भात कुठलाही विषय झालेला नाही. साडेतीन वर्षांनंतर दादासोबत जेवण केले. दादा परत आल्याने त्यांच्या बंगल्याला, जळगावला गतवैभव आले आहे. याचा आम्हाला खूप आनंद आहे.
जाणीवपुर्वक संकटे लादली
सुरेशदादा आमचे जेष्ठ नेते आहेत, त्यामुळे राजकारणात सक्रिय होण्याबाबत ते निर्णय घेतील. दादांवर प्रेम करणारी मंडळी आहेत. जाणीवपुर्वक त्यांच्यावर संकट लादली गेलीत, हे कुभांड कुणी रचले हे सर्वांनाच ठाऊक आहे. यामुळे दादांवर प्रेम करणारी मंडळी वाढल्याचे गिरीश महाजन म्हणाले.
गुलाबराव पाटलांनी घेतली होती भेट
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी देखील सुरेशदादा जैन यांची भेट घेतली होती. सुरेशदादा जैन आमचे मार्गदर्शक आहेत, त्यांचे बोट धरूनच आपण राजकारणात आलो आहोत. बऱ्याच दिवसांनी ते जळगावात आले. त्यांची भेट आज आपल्याला घेता आली. वडिलकीच्या नात्याने राजकारणात त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केले आहे. मला त्यांचं दर्शन घेता आलं, त्यामुळे स्वत:ला मी भाग्यवान समजतो. आजपर्यंत त्यांनी जनतेला वेळ दिलेला आहे. आता ते आपल्या कुटुंबाला वेळ देणार आहेत. हे करीत असताना त्यांनी आमच्याकडेही लक्ष द्यावे आणि आमच्या काही चुका होत असतील तर त्याही सांगाव्यात. शहराच्या विकासाकरिता त्यांनी आम्हाला सहकार्य करावे, अशीच आमची अपेक्षा राहणार आहे.
सुरेशदादा मुंबईत होते, तरी त्यांचे लक्ष जळगावात होते. ‘पक्षी फिरे आकाशी, त्याचे लक्ष पिलापाशी’ अशी अवस्था त्यांची होती. राजकारणाच्या मैदानात त्यांनी उतरावे अशी आपलीही इच्छा आहे. मात्र, तो त्यांचा वैयक्तीक निर्णय आहे, असेही गुलाबराव पाटील यांनी नमूद केले.