जळगाव : राज्यभर चर्चेत राहिलेल्या जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणूक नंतर चेअरमनपदी कुणाची वर्णी लागते याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. आज चेअरमन पदासाठी अर्ज सादर करण्याची मुदत होती. मात्र, आमदार मंगेश चव्हाण यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे त्यांनी बिनविरोध निवड झाली आहे.
चेअरमन पदासाठी अनेक नावं चर्चेत असताना चेअरमन निवडीच्या पार्श्वभूमीवर संचालक मंडळाची बैठक शनिवार दिनांक १७ रोजी आयोजित करण्यात आली होती. या नूतन संचालक मंडळाच्या बैठकीत मंत्री गिरीष महाजन यांचे निकटवर्तीय चाळीसगावचे भाजपाचे आमदार मंगेश चव्हाण यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. आज शेतकरी विकास पॅनलतर्फे आमदार मंगेश चव्हाण यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाली आहे.
बैठकित मंगेश चव्हाणांचे नाव फायनल
शनिवारी रात्री उशिरा ११ वाजेपर्यंत नूतन संचालकांची बैठक झाली. या बैठकीला ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह संचालक उपस्थित होते. जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत आमदार मंगेश चव्हाण यांची मोठी भूमिका आहे. खडसेंच्या विरुद्ध बंड पुकारून निवडणुकीत रंगत आणली, तर मुक्ताईनगर मतदार संघातून मंदाकिनी खडसे यांना त्यांच्याच मतदार संघातून आव्हान देत विजय मिळविला. या विजयामुळे मंगेश चव्हाण राज्याच्या राजकारणात चर्चेत आले. त्यामुळे बैठकीत आमदार चव्हाण यांच्याच नावावर शिक्कामोर्तब झाले होते. आज सकाळी त्यांनी शेतकरी पॅनलकडून अर्ज दाखल केला होता.