मुंबई : काही पोलिसांनी हॉटेलमध्ये जेवण करताना मटणाचा रस्सा चांगला नसल्याची तक्रार हॉटेल मालकास केली. यामुळे झालेल्या वादातून हॉटेल चालकाने शटर बंद करून तिघा पोलिसांना मारहाण केली. या प्रकरणी नवी मुंबईतील कोपरखैरणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून मारहाण करणाऱ्यांचा पोलीस शोध घेत आहेत. कोपरखैरणेतील जगदंब हॉटेलमध्ये ही घटना घडली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, कोपरखैरणे पोलीस ठाण्यातील कर्मचारी किरण साबळे व त्यांचे दोन सहकारी कोपरखैरणेतील जगदंब हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. यावेळी त्यांना वाढलेल्या मटणाच्या रश्याची चव नसल्याची तक्रार त्यांनी केली. यावेळी हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी त्यांना “खायचे असेल तर खा नाही तर नका घाऊ,” असे प्रतिउत्तर दिलं. यावरून हॉटेल मालक आणि तीन पोलीस कर्मचारी यांच्यामध्ये वादाला तोंड फुटले. पुढे या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले.
हॉटेल मालक, कर्मचारी फरार
तिघा पोलिसांनी त्यांना ग्राहकांसोबत अशा प्रकारे उद्धट बोलण्याचा जाब विचारला. यावरून हॉटेल कर्मचारी आणि पोलीस यांच्यात शाब्दिक चकमक झाली. त्यामुळे हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी शटर बंद करून पोलिसांना डांबून ठेवून मारहाण केली. यामध्ये तिघेही पोलीस जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी कोपरखैरणे पोलीस स्टेशनमध्ये हॉटेल मालक अक्षय जाधव आणि इतर तिघांवर गुन्हा दाखल केला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.