बीड : आज राज्यभरात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान झाले. त्यातच बीडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ग्रामपंचायत सरपंच पदाच्या उमेदवारांच्या नावासमोर असलेले बटन स्टिकफास्ट टाकून बंद केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. ही धक्कादायक घटना बीड तालुक्यातील लिंबागणेश येथे उघडकीस आली.
याबाबत तक्रार करण्यात आली आहे. तर तक्रार झाल्यानंतर सदरील मशीन बदलण्यात आली. यामुळे मतदान तब्बल दीड तास बंद झाले होते. तर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मतदान रोखण्यासाठी अजब फंडा वापरण्यात आला. त्यामुळे चक्क ईव्हीएम मशीन बदलावी लागली.
तक्रारीनंतर ईव्हीएम मशीन बदलली
बीड तालुक्यातील लिंबागणेश येथे 2 नंबरच्या बुथवर ईव्हीएम मशीनमध्ये गणेश वाणी यांच्या नावासमोर असलेल्या बटनावर स्टिकफास्ट टाकण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत उमेदवार वाणी यांनी तक्रार केल्यानंतर मतदान केंद्राध्यक्ष यांनी खात्री केली आणि सदरील ईव्हीएम मशीन बदलण्यात आली.
गुन्हे दाखल करण्याची मागणी
या प्रकारानंतर काही काळ लिंबागणेश येथे गोंधळ उडाला होता. मतदान प्रक्रियादेखील थांबवण्यात आली होती. सदरील प्रकार कोणी केला याचा तपास करून संबंधित लोकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी गणेश वाणी यांनी केली आहे.