जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | जळगाव तत्कालीन तहसीलदार अमोल निकम यांनी अवैध वाळू प्रकरणात शासनाचे २ कोटी १२ लाख २९ हजार ७०० रुपयांचे महसुलाचे नुकसान केले असल्याची तक्रार माहिती अधिकारी कार्यकर्ते दीपक गुप्ता यांनी केली आहे.
जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात गुप्ता यांनी म्हटले आहे की, जळगाव चे तत्कालीन तहसीलदार अमोल निकम यांनी अवैध वाळू प्रकरणात संबंधित लोकांना वाचवण्यासाठी शासनाचे दोन कोटी बारा लाखावर नुकसान केले आहे. या प्रकरणी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येऊन झालेल्या नुकसानाची भरपाई निकम यांच्याकडून वसूल करण्यात यावी, तसेच त्यांना शासकीय सेवेतून बरखास्त करण्यात यावे अशी मागणी केली आहे.
प्राप्त माहिती नुसार, ११ नोव्हेंबर २०१६ रोजी तत्कालीन जिल्हाधिकारी श्रीमती रुबल अग्रवाल, तत्कालीन प्रांताधिकारी अभिजित भांडे पाटील यांनी जळगावचे तत्कालीन तहसीलदार अमोल निकम यांना व्हाट्सअप्प आणि व्हिडीओ क्लिप पाठवून अवैध वाळू प्रकरणाची तक्रार केली होती. त्यानुसार जळगाव ममुराबाद रस्त्यावर शिवाजी नगर हुडको च्या पाठीमागे ममुराबाद पुलाजवळ जळगाव शहरातील तलाठीच्या अहवालानुसार सिटी सर्वे नं ५०७/1 इंद्रा प्रा लिमिटेड यांचे असल्याचे सांगण्यात आले. हा वाळूसाठा १ ते ३ हजार ब्रास असल्याचे सांगण्यात आले. परंतु यावर प्रशासनाने संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली होती. त्यानंतर त्याच दिवशी तत्कालीन मंडळ अधिकारी मिलिंद बुवा आणि तत्कालीन तलाठी फिरोज खान यांनी पंचनामा करतांना हा अवैध वाळूचा साठा १२५५ ब्रास असल्याचे दाखवले. त्यानंतर तत्कालीन तहसीलदार अमोल निकम यांनी या संदर्भात विनंती करून त्याचा पाठपुरावा करण्यात आला. परंतु निकम यांनी संबंधित प्रकरणाकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे शासनाचे मोठ्याप्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.
तसेच त्यांनी या अवैध वाळूसाठा प्रकरणी कोणताही पंचनामा व मोजमाप केले नाही. तरी प्रशासनाने याप्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी दीपक गुप्ता यांनी केली आहे.