जळगाव: विधानपरिषदेचे हिवाळी अधिवेशन सुरू असून माजी मंत्री तथा विधानपरिषद सदस्य एकनाथराव खडसे यांनी राज्यातील गायरान जमिनीवरील अतिक्रमणे काढण्यात येऊ नये, तसेच मुक्ताईनगर तालुक्यात अवैधरित्या सुरू असलेले गौण खनिज उत्खनन आणि चोरटी वाळू वाहतुकीबाबत प्रश्न उपस्थित केले. याला महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लेखी उत्तरे दिली.
यामध्ये राज्यातील गायरान जमिनीवरील अतिक्रमणाबाबत महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, गायरान जमिनीवरील अनधिकृत बांधकामे ही वर्ष अखेरपर्यंत निष्कासित करण्याबाबत रोडमॅप तयार करण्याबाबत मा. उच्च न्यायालयाने विचाराधीन जनहित याचिका प्रकरणी आदेश दिले आहेत. त्यानुसार प्रतिज्ञापत्राद्वारे रोडमॅप उच्च न्यायालयात दाखल करण्यात आले आहेत.
पुढील आदेशापर्यंत स्थगिती
शासनाच्या यापूर्वीच्या इतर कोणत्याही धोरणानुसार पात्र होणारी संरक्षित होणारी अतिक्रमणे वगळून उर्वरित अतिक्रमण निष्कासित करावी, अशी शासनाची भूमिका आहे. सद्यस्थितीत प्रकरण न्याय प्रविष्ट असून उच्च न्यायालयाने 6 डिसेंबर 2022 रोजी दिलेल्या आदेशन्वये निष्कासनाच्या कार्यवाहिस पुढील आदेशापर्यंत स्थगिती दिली आहे.
प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या सूचना
तसेच एकनाथराव खडसे यांनी मुक्ताईनगर तालुक्यात अवैध गौण खनिज उत्खनन व वाळू उपसा होत असल्याबद्दल तसेच सातोड शिवरात उत्खनन करताना एक जेसीबी आणि एक डंपर मुक्ताईनगर तहसीलदार यांनी जप्त केले होते. त्यावर काय कारवाई झाली? असा प्रश्न उपस्थित केला होता. त्याला महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उत्तर दिले. त्यावेळी ते म्हणाले
, मुक्ताईनगर तालुका क्षेत्रीय अधिकाऱ्यांना गौण खनिजाचे व वाळूचे अवैध उत्खनन व वाहतूक होणार नाही, याबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबाबत सूचित करण्यात आले आहे.
32 लाख रुपये दंड वसूल
या वाहतुकीला आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय मार्फत दक्षता पथक तसेच महसुल परिवहन व पोलीस यांच्या संयुक्त पथकामार्फत वेळोवेळी कारवाया करण्यात येतात. त्यानुसार मुक्ताईनगर तालुक्यात 1 एप्रिल 2022 पासून नोव्हेंबर महिन्यापर्यंत 12 वाहनांवर कारवाई करण्यात आली असून 32 लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. संबंधिताविरुद्ध 10 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सातोड शिवारात जप्त करण्यात आलेले जेसीबी डंपर मालकास 16 लाख रुपये दंडात्मक रकमेच्या नोटीस देण्यात आल्याचे सांगितले.