मणिपूरच्या नोनी जिल्ह्यात बुधवारी शैक्षणिक सहलीवर फिरायला निघालेल्या दोन स्कूल बसचा भीषण अपघात झाला. बस पलटल्याने झालेल्या अपघातात 15 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला तर अनेक विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. अशा परिस्थितीत मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
मणिपूरमधील नोनी जिल्ह्यात बुधवारी सकाळी भीषण रस्ता अपघात झाला. या अपघातात अनेक विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्राथमिक वृत्तानुसार, यारीपोक येथील थंबलानु उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना घेऊन दोन बस शैक्षणिक सहलीसाठी खापुम येथे जात असताना हा अपघात झाला.
जखमी विद्यार्थ्यांवर रुग्णालयात उपचार
न्यूज 18 च्या वृत्तानुसार, अपघातात 15 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती आहे. यासोबतच अनेक विद्यार्थी जखमी झाल्याचीही बातमी आहे. हा अपघात बिष्णुपूर-खौपुम रोडवर लोंगसाई तुबुंग गावाजवळ घडल्याचे सांगण्यात येत आहे. जखमी विद्यार्थ्यांना उपचारासाठी इंफाळ येथील मेडिसिटी रुग्णालयात नेण्यात आले आहे. अहवालानुसार, आतापर्यंत 22 विद्यार्थ्यांना आणण्यात आले आहे.
बचावदल घटनास्थळी दाखल
मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांनीही या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी एक व्हिडिओ ट्विट करून म्हटले आहे की, “आज जुना काचार रोडवर शाळकरी मुलांना घेऊन जाणाऱ्या बसला झालेल्या अपघाताबद्दल ऐकून खूप दुःख झाले. बचाव कार्यात समन्वय साधण्यासाठी SDRF, वैद्यकीय पथक आणि आमदार घटनास्थळी पोहोचले आहेत. मी सर्वांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करतो.”