बीजिंग : चीनमध्ये सध्या पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक झाला आहे. चीनमधील स्मशानभूमींमध्ये मृतदेहांचे ढीग लागले आहेत, तर दवाखान्यांत रुग्णांसाठी जागा अपुरी पडत आहे, असे चित्र पुढे येऊ लागले आहे. जगभरात सर्वत्र कोरोना नियंत्रणात असताना चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक का झाला, असा प्रश्न या निमित्ताने विचारला जात आहे.
चीनमध्ये कोरोनाच्या दहशतीमुळे लोक स्वत:ला आयसोलेट करत आहेत. त्यामुळे रस्त्यावर भयाण शांतता दिसून येत आहे. चीनच्या अनेक बड्या शहरात कोरोना रुग्णांनी डोकेवर काढले आहे. त्यात काही शहरांत हॉस्पिटलमध्ये एंटिझेन टेस्ट किटची कमतरता जाणवू लागली आहे. स्मशानभूमीत रांगा लागल्यात. आगामी काही दिवसांत चीनमध्ये कोरोनाची तिसरी लाट येईल, त्यासाठी अलर्ट राहा. कोरोना रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता आहे असा इशारा चीनमधील तज्ज्ञांनी दिला आहे.
सणांमध्ये धोक्याची घंटा
चीनचे महामारी प्रमुख व्यू जुन्यो यांनी इशारा दिलाय की, देशात कोरोनाची तिसरी लाट लवकरच येणार आहे. क्रिसमस, न्यू ईयर, लूनर न्यू ईयर या सणांमध्ये धोक्याची घंटा आहे. कारण या सणाला सगळेजण एकत्रित येतात. त्यामुळे अशा वातावरणात धोका कित्येक पटीने वाढू शकतो. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेतील पहिला टप्पा या सर्दीमध्ये येईल असं त्यांनी म्हटलं आहे.
भारतातही केंद्र सरकार अलर्ट मोडवर
चीनमधील कोरोनाची वाढती आकडेवारी लक्षात घेता भारतातही केंद्र सरकारने सर्व केंद्रशासित प्रदेश आणि राज्य सरकारांना पत्र पाठवत बाधितांच्या नमुन्यांचे जिनोम सिक्वेनसिंग करण्याच्या सूचना दिल्या आहेत. केंद्रीय राज्यमंत्री डॉ, भारती पवार यांनीदेखील देशातील मास्क सक्तीबाबत सूचक विधान केले आहे. पवार यांच्या या वक्तव्यामुळे राज्यासह देशात पुन्हा मास्क सक्तीच्या चर्चांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार अलर्ट मोडवर आले आहे.