हैदराबाद : सरकारने संपादित केलेल्या जमिनीची भरपाई म्हणून एका शेतकऱ्याला 1 कोटींची रक्कम मिळाली. मात्र, त्याचा हा आनंद जास्त काळ टिकू शकला नाही. सरकारकडून मिळालेली ही रक्कम त्याच्या मुलाने ऑनलाइन कॅसिनोमध्ये उडवल्याने मोठे नुकसान झाले आहे. हैदराबादजवळील तेलंगणातील रंगारेड्डी जिल्ह्यात ही धक्कादायक घटना समोर आली आहे. श्रीनिवास रेड्डी यांच्या मुलाने मोबाईलवर ऑनलाइन गेम खेळताना हे सर्व पैसे गमावले आहे.
श्रीनिवास रेड्डी यांची शहाबाद मंडलातील सीतारामपूर येथील 10 एकर जमीन अलीकडेच तेलंगणा राज्य औद्योगिक पायाभूत सुविधा महामंडळ (TSIIC) साठी सरकारने संपादित केली आहे. त्यांना 10.5 लाख रुपये प्रति एकर दराने 1.05 कोटी रुपये नुकसान भरपाई मिळाली. या पैशातून त्यांना हैदराबादच्या हद्दीतील शमशाबाद मंडलातील मल्लापूर येथे अर्धा एकर जमीन खरेदी करायची होती. त्यांनी 70 लाख रुपयांचा करार केला होता आणि 20 लाख रुपये अॅडव्हान्स म्हणून दिले होते. उर्वरित 85 लाख रुपयांपैकी श्रीनिवास रेड्डी यांनी 42.5 लाख रुपये स्वत:च्या बँक खात्यात आणि उर्वरित रक्कम त्यांची पत्नी विजयालक्ष्मी यांच्या खात्यात जमा केली.
ऑनलाइन गेम खेळणे पडले महागात
या दाम्पत्याचा धाकटा मुलगा हर्षवर्धन रेड्डी, जो हैदराबादमधील निजाम कॉलेजमध्ये प्रथम वर्षाचा विद्यार्थी होता, त्याने जमीन मालकाला पैसे देतो असे सांगून त्याच्या वडिलांच्या खात्यातून पैसे स्वतःच्या खात्यात हस्तांतरित केले. 19 वर्षीय मुलाने हीच बाब आईला सांगून खात्यातून पैसे काढले. ऑनलाइन गेम खेळण्याचे व्यसन असलेल्या हर्षवर्धन रेड्डी याने ऑनलाइन कॅसिनोमध्ये हप्त्याने पैसे गुंतवण्यास सुरुवात केली. काही आठवड्यातच त्याचे सर्व पैसे संपले.
सायबर पोलिसात तक्रार
त्याच्या आई-वडिलांनी पैशांबाबत विचारणा केली असता, त्याने सर्व प्रकार सांगितला. ही बाब ऐकून दाम्पत्य आणि त्यांचा मोठा मुलगा सिरपाल रेड्डी यांना मोठा धक्काच बसला. हर्षवर्धन रेड्डी याने ऑनलाइन जुगार खेळण्यासाठी गावातील काही लोकांकडून 7 लाख रुपये उसने घेतल्याचेही सांगितले जात आहे. श्रीनिवास रेड्डी यांनी सायबराबाद पोलीस आयुक्तालयाच्या सायबर क्राईम पोलिसांना तक्रार केली आहे.