जळगाव : महापालिकेच्या महासभेत उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ भाजपाच्या वतीने महापालिकेसमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. तर त्याच ठिकाणी एकाच वेळी दुसऱ्या बाजूने उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या समर्थनार्थ देत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने भाजपाच्या नगरसेवकांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. एकाच वेळी एकाच ठिकाणी दोन वेगवेगळ्या पक्षाने केलेल्या आंदोलनाकडे जळगाव शहरवासियांचे लक्ष वेधले होते.
जळगाव महापालिकेच्या सभेत उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी रामायणातील रावणाबद्दल बोलत रावण हा रामापेक्षा श्रेष्ठ असल्याचे वक्तव्य केले होते. यावरुन भाजप आक्रमक झाली असून, महापालिकेसमोर आज आंदोलन करण्यात आले. यावेळी उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. यावेळी भाजप नेते दीपक सुर्यवंशी, नगरसेवक जितेंद्र मराठे, कैलास सोनवणे, अश्विन सोनवणे आदी नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते.
शिवसेनेतर्फे भाजप नगरसेवकांचा निषेध
तर शिवसेना उध्दव ठाकरे गटाने देखील भाजपविरोधात मनपासमोर आंदोलन केले. यावेळी जळगाव शहरातील विविध विकास कामांना व पिंप्राळा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवस्मारकाला विरोध करणाऱ्या भाजप नगरसेवकांचा निषेध करण्यात आला. या आंदोलनात जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, शहर प्रमुख शरद तायडे, गजानन मालपुरे यांसह शिवसेना नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.