रावेर राजमुद्रा वृत्तसेवा | रावेर तालुक्यातील मागलवाडी गावातील ३५० घरंच्या पुनर्वसन व संपादनासाठी उपोषणाला बसण्यासंदर्भात महाराष्ट्र राज्य सर्व शक्ती सेनेतर्फे आज जिल्हाधिकारी अभिजित राउत यांना निवेदन देण्यात आले. पुनर्वसनाच्या यादीत नाव असूनही शासनाकडून गावाला डावलले जात असल्याने गावाचे पुनर्वसनाचे काम त्वरित पूर्ण करावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य सर्व शक्ती सेनेचे अध्यक्ष प्रा. संजय मोरे यांचेसह मांगलवाडी ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली आहे. जळगाव येथील ज म प्र वि. कार्यकारी अभियंता अदिती कुलकर्णी यांनाही सदर निवेदन देण्यात आले असून मागणी एक महिन्यात पुर्ण न झाल्यास प्रा संजय मोरे सर्व शक्ती सेना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष यांच्या नेतृत्वा खाली संपुर्ण महाराष्ट्रात आदोलन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
‘तापी नदीकाठावरील मांगलवाडी येथील तापी पाटबंधारे विकास महामंडळाच्या नियामक मंडळाची बैठक क्र.५० मध्ये ठराव क्र.५०.७ मध्ये उर्ध्व तापी टप्पा-१ (हतनूर) प्रकल्पा आंतर्गत मांगलवाडी येथील ३५० घरांचे सम्पादन व पुनर्वसन मान्य असून सदरचा खर्च जलसंपदा विभागामार्फत करण्याकरिता सदरचे हमीपत्र असूनही याची दखल घेतली जात नाही. गेल्या काही वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित असून शासनस्तरावर संबंधित अधिकारी व मंत्री यांच्याजवळ पाठपुरावा करूनही या कामाची दखल घेतली गेलेली नाही. गाव तिन्ही बाजूने बाराही महिने पाण्याने वेढलेले असून नदीला पुराचे पाणी वाढल्यास, पावसाची झडी लागल्यास गावाची संपूर्ण जमीन ओलसर राहते. त्यामुळे घरांमध्ये सर्दावा (ओलावा) वाढून भिंतींना मीठासारखे पांढरे द्रव्य लागते. घरातील फाशीवर घर पाझरल्यासारखे पाण्याचे थेंब येतात. अनेकांना उंचावर झोपावे लागते. जमीन खोदल्यास जमीनीखाली जवळच ८ ते १० फुटावर पाणी लागेल. पूराचे पाणी जास्त दिवस राहील्यास अथवा यावेळी भुकंपाने जमीन हलल्यास गाव जमीनीखाली जाण्याचा मोठा धोका आहे. गावाच्या आजूबाजूला पाणी असल्याने सरपटणारे प्राण्यांपासून अनेकदा धोका निर्माण होतो.’ असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
याप्रसंगी, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना निवेदन देताना महाराष्ट्र राज्य सर्व शक्ती सेनेचे अध्यक्ष प्रा.संजय मोरे, सर्व शक्ती सेना विद्यार्थी संघटना, जळगाव जिल्हाध्यक्ष कृष्णा सावळे, अनिल कोळी, कोळी राष्ट्रसंघ जिल्हाध्यक्ष, प्रा. सुभाष सपकाळे, विजय तायडे, गजानन काडेले, धनराज कोळी, उमेश तायडे, दिपक तायडे आदी उपस्तित होते.