सोलापूर : राज्यात अनेक ठिकाणी गर्भलिंग निदान होत आहे, त्यामुळे सामाजिक प्रश्न निर्माण झाले आहेत. मुलींची कमी होत असलेली संख्या तसेच मुलींच्या वाढलेल्या अपेक्षा यामुळे मुलांचे लग्न न होण्याचे प्रमाण वाढले आहे. मुलांना मुली मिळत नसल्याने मुलगी द्या म्हणत सोलापुरात ज्योती क्रांती संघटनेतर्फे अनोखं आंदोलन करण्यात आलं.
गर्भलिंग निदान कायद्याची कडक अंमलबजावणी न झाल्याने तरुणांना लग्नासाठी मुली मिळत नाहीत. लग्नाचं वय निघून चाललं आहे, वधू पक्षांकडून अपेक्षा वाढल्या आहेत. कायम रोजगार नाही, सरकारी नोकरी नाही, मुलगा शेतीच करतो, अशा विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. आमची लग्नाची वयं उलटून चालली आहेत. आम्हाला एखादी बायको द्या, या मागणीसाठी मोर्चा काढला होता. विवाहेच्छुक नवरदेवांनी घोड्यावर बसून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता.
मुलींच्या संख्येत लक्षणीय घट
क्रांती ज्योती परिषदेचे प्रमुख रमेश बारसकर यांनी माहिती देताना सांगितले की, देशातील फक्त केरळ राज्यात मुलींची संख्या पुरुषांपेक्षा अधिक आहे. महाराष्ट्र राज्यात हजार पुरुषांमागे संख्या कमी होत चालली आहे. सोलापूर जिल्ह्यातील देखील परिस्थिती बिकट होत चालली आहे. सरकारने यासाठी पीसीपीएनडीटी कायदा आणला आहे, पण या कायद्याची कडक अंमलबजावणी केली जात नाही. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील मुलांना लग्नासाठी मुली मिळत नाहीत. अशा विविध मागण्या करत मोहोळ तालुक्यातील इच्छुक नवरदेवांनी घोड्यावर बसून वरात काढली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात नवरदेवांचा मोर्चा
जिल्हाधिकारी कार्यालयात इच्छुक नवरदेवांनी घोड्यावर वरात काढत निवेदन दिले. यात आम्हाला मुलगी द्या, अन्यथा मुली न मिळण्याची समस्या आहेत, त्या अडचणी दूर करा. गर्भलिंग निदान चाचणीच्या माध्यमातून मुलींऐवजी मुलांना प्राधान्य देण्यात येत असल्यामुळे मुलींची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे येणाऱ्या पिढीचे भविष्य अंधकारमय झाले आहे. वेळेत लग्न जमत नसल्याने मुले व्यसनाधीन होत आहेत, त्यामुळे सरकारने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली आहे.