जळगाव : टोळीने गुन्हे करण्याच्या पद्धतीचा अवलंब करणाऱ्या तिघा गुन्हेगारांना मुंबई पोलिस कायदा कलम 55 नुसार जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. रामानंद नगर पोलिस स्टेशन हद्दीतील राजीव गांधी नगर परिसरात राहणारे तिघे जण असून त्यांना एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागरसिंग जिवनसिंग जुन्नी, रणजितसिंग जिवनसिंग जुन्नी आणि शक्तीसिंग ऊर्फ हग्गु जिवनसिंग जुन्नी अशी राजीव गांधी नगरातील तिघा आरोपींची नावे आहेत. या तिघांविरुद्ध रामानंद नगर पोलिस स्टेशनला आर्म अॅक्टसह विविध कलमाखाली गुन्हे दाखल आहेत. या तिघांच्या हद्दपार प्रस्तावाची चौकशी उपविभागीय पोलीस अधिकारी, जळगाव उपविभाग यांनी केली आहे.
वेळोवेळी केल्या प्रतिबंधक कारवाया
हद्दपार करण्यात आलेल्या तिघांच्या टोळीने जळगाव शहर व परिसरात दहशत पसरवण्यासह नागरिकांमधे भिती निर्माण केल्याचे वेळोवेळी उघड झाले आहे. जळगाव शहरातील शांतता प्रस्थापित करण्यासाठी त्यांच्याविरुद्ध वेळोवेळी प्रतिबंधक कारवाया करण्यात आल्या होत्या. तरी देखील त्यांच्या वर्तनात कोणताही बदल झाला नाही. जनतेच्या मालमत्तेस मोठा धोका निर्माण झाला असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. पोलिस अधिक्षक एम. राजकुमार यांनी सदर कारवाई केली आहे.