मुंबई : उंच उड्डाण घेण्याची हिंमत बाळगत असाल तर लक्ष्य कितीही उंच आहे याने काही फरक पडत नाही. मिर्झापूरच्या सानिया मिर्झा या मुलीने आपल्या स्वप्नांना पंख लावून उड्डाण केले आहे. हे उड्डाण देशातल्या इतर मुलींसाठी प्रेरणास्थान बनले आहे. सानिया ही मिर्झापूर जिल्ह्यातील जसोवर येथे राहणाऱ्या टीव्ही मेकॅनिकची मुलगी असून तिने एनडीएची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. लढाऊ वैमानिक म्हणून निवड झालेली ती भारतीय हवाई दलातील पहिली मुस्लिम मुलगी आहे.
मिर्झापूर जिल्ह्यातील देहत कोतवाली भागातील जसोवर येथे राहणारी टीव्ही मेकॅनिक शाहिद अली यांची मुलगी सानिया मिर्झा हिने एनडीए परीक्षा उत्तीर्ण केली आहे. जसोवरच्या या मुलीने देशात नावलौकिक मिळवला आहे. सानिया मिर्झाने गावातील पंडित चिंतामणी दुबे इंटर कॉलेजमधून प्राथमिक ते दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. यानंतर तिने गुरुनानक इंटर कॉलेजमधून बारावीचे शिक्षण घेत जिल्ह्यात अव्वल ठरली. बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर सेंच्युरियन डिफेन्स अकॅडमीमधून तिने तयारी केली. सानिया मिर्झाच्या जॉईनिंग लेटरनंतर कुटुंबीय आनंदी आहेत. 27 डिसेंबरला सानियाला खडगवासला पुणे येथे जाऊन एनडीएमध्ये सामील व्हायचे आहे.
मुलीच्या शिक्षणासाठी वडिलांनी घेतली मेहनत
मुलीला पैशांमुळे कोणतीही अडचण येऊ नये म्हणून सानिया मिर्झाचे वडील शाहिद अली यांनी आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी 8 तासांऐवजी 12 ते 14 तास मेहनत घेतली. आज मुलीने असे काम केले आहे, ज्याचा आपल्याला अभिमान वाटतो असे ते सांगतात. तर मुलगी जेव्हा अभ्यासाला जायची तेव्हा रात्री खूप टेन्शन असायचे. आजूबाजूचे लोकही खूप काही सांगायचे, पण आज आम्हाला तिचा अभिमान असल्याचे सानियाची आई तबस्सुम मिर्झा यांनी सांगितले.
19 जागा महिलांसाठी राखीव
नॅशनल डिफेन्स अकॅडमी 2022 च्या परीक्षेत पुरुष आणि महिलांसाठी 400 जागा होत्या. ज्यामध्ये 19 जागा महिलांसाठी राखीव होत्या. फायटर पायलटसाठी दोन जागा राखीव होत्या. ज्यामध्ये सानिया मिर्झाने तिची जागा निश्चित केली आहे. यापूर्वी एकदा सानियाने परीक्षा दिली होती, जिथे ती पात्र ठरली नव्हती. दुसऱ्यांदा लेखी, मुलाखत, सीपीएस मेडिकल फिटनेस पात्रता मिळवून दोन जागांवर स्थान मिळवण्यात तिला यश आले.