जळगाव : जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत भालोद येथील दुध उत्पादक सहकारी संस्थेने दिलीप चौधरी यांच्या नावाने मतदानाचा ठराव केला होता. यात मतदानासाठी जे काही पाकिट येईल त्यातील वाटा उत्पादकांना देण्यात येईल असे ठरले होते. मात्र मतदान होऊन अनेक दिवस उलटून देखील वाटा न मिळाल्याने आज दुध उत्पादकांनी सोसायटीच्या समोरच दिलीप चौधरी यांना जाब विचारला. यावर दिलीप चौधरी यांनी आपण एक पैसा देखील न घेता भाजपच्या उमेदवारांना मतदान केल्याचे सांगितले. तथापि, इतरांचा यावर विश्वास बसला नाही. यामुळे ही शाब्दीक चकमक हमरातुमरी आणि अखेर गुद्दागुद्दीवर आली.
यावरूनच राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांनी जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत वारेमात पैशाची उधळण झाली हे अधोरेखित झाले असल्याचा टोला विरोधकांना लगावला आहे. भाजपकडून मोठ्या प्रमाणात दूध संघाच्या मतदारांना पैशांची देवाण-घेवाण करण्यात आली असा देखील आरोप राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांनी केल्याने राजकीय वातावरण तापले आहे. यामुळे खडसे महाजन पुन्हा एकदा दूध संघाच्या निवडणुकीत पैसे वाटपावरून आमने-सामने आल्याचं दिसून येत आहे.
गिरीश महाजन यांनी फेटाळला आरोप
राज्याचे ग्रामीण विकास मंत्री भाजप नेते गिरीश महाजन यांनी पैसे वाटपाचा आरोप पेटवून लावलेला आहे. नागरिकांना तसेच मतदारांना पैसे मिळाले नाही हे खरे आहे. आम्ही देखील कुठल्याही पैसे वाटप जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत केला नसल्याचा दावा ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे.