जळगाव: जळगाव जिल्हा दूध संघाची निवणुक चांगलीच गाजली. या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर पैसे वाटप केल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. असे असताना आता दूध संघाच्या अर्थकारणाचे प्रकरण थेट मतदारांमध्ये हाणामारीपर्यंत पोहोचले आहे.
जळगाव जिल्हा दुध संघाच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत दोन्ही बाजूंकडून पैशांची वारेमाप उधळण करण्यात आल्याची चर्चा कधीपासूनच रंगली आहे. मात्र हा मुळातच ‘तेरी भी चुप मेरी भी चुप !’ असा मामला असल्याने कुणी याबाबत जाहीर बोलले नाही. मात्र आज यावल तालुक्यातील भालोदमध्ये हा वाद चव्हाट्यावर आला.
भालोद येथे वादंग
भालोद येथील दुध उत्पादक सहकारी संस्थेने दिलीप चौधरी यांच्या नावाने मतदानाचा ठराव केला होता. यात मतदानासाठी जे काही पाकिट येईल त्यातील वाटा उत्पादकांना देण्यात येईल असे ठरले होते. मात्र मतदान होऊन अनेक दिवस उलटून देखील वाटा न मिळाल्याने आज दुध उत्पादकांची सटकली आणि त्यांनी सोसायटीच्या समोरच दिलीप चौधरी यांना जाब विचारला. यावर दिलीप चौधरी यांनी आपण एक पैसा देखील न घेता भाजपच्या उमेदवारांना मतदान केल्याचे सांगितले. तथापि, इतरांचा यावर विश्वास बसला नाही. यामुळे ही शाब्दीक चकमक हमरातुमरी आणि अखेर गुद्दागुद्दीवर आली. यामुळे दुध संघाच्या निवडणुकीच्या अर्थकारणाला अखेर वाचा फुटल्याचे दिसून आले आहे.