पुणे : वडिलांचे बाहेरील महिलेशी प्रेमसंबंध असल्याने मुलांनी आपल्या वडिलांची हत्या केली. यानंतर ‘दृश्यम’ चित्रपटातील कथानकाप्रमाणे त्यांचा मृतदेह भट्टीत टाकून नष्ट केला. मात्र, पोलिसांच्या तपासाने दोन सख्ख्या भावांना अवघ्या दोन तासांत गजाआड करण्यात आले आहे. धनंजय बनसोडे (वय 45, रा. निघोजे, ता. खेड) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी दिली दिलेल्या माहितीनुसार, सुजित धनंजय बनसोडे (वय 22, रा. निघोजे), अभिजीत धनंजय बनसोडे (वय 18, रा. निघोजे) अशी अटक करण्यात आलेल्या सख्ख्या भावांची नावे आहेत. धनंजय बनसोडे यांचा फरसाण बनविण्याचा व्यवसाय असून, त्यांची ‘ग्लोबल फूड्स’ नावाची कंपनी आहे. ते 15 डिसेंबर रोजी बेपत्ता झाल्याची पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.
घातपाताची आधीच आली होती शंका
बनसोडे यांचे नागपूर येथील एक महिलेसोबत प्रेमसंबंध होते. याबाबतची माहिती समजल्यानंतर धनंजय यांचे घरात पत्नी व मुले सुजित, अभिजित यांच्याशी वारंवार वाद होत होते. त्यामुळे आपली मुले आपला घातपात करून जिवे ठार मारतील, अशी शंका त्यांना आली होती व ती त्यांनी प्रेयसीस बोलून दाखवली होती. दरम्यान, धनंजय हे बेपत्ता असल्याबाबत तपास करताना पोलिसांना त्यांच्या प्रेयसीबाबतची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तपास केला.
मुलांनी दिली खुनाची कबुली
दरम्यान, महाळुंगे पोलिसांत धनंजय बनसोडे हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानुसार तांत्रिक माहिती वापर करून तपास करत असताना पोलिसांनी मुले सुजित आणि अभिजीत यांकडे अधिक तपास केला असता वडिलांचे प्रेमसंबंध मान्य नसल्याने त्याला जिवे ठार मारल्याचे कबूल केले. पुढील तपास म्हाळुंगे पोलीस चौकीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली येथील पोलीस करत आहेत.