नाशिक: दोन दिवसापूर्वीच टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्मा हिने टीव्ही सेटवर गळफास लावून आत्महत्या केली. यानंतर पोलिसांनी तिचा सहकलाकार शीझान खानला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अटक केली. आता याप्रकरणी भाजप नेते मंत्री गिरीश महाजन यांनी मोठा दावा केला आहे. तुनिषा शर्माचा मृत्यू हे ‘लव्ह जिहाद’चे प्रकरण असल्याचा दावा त्यांनी केला आहे. राज्य पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत असंही ते म्हणाले आहे.
यासोबतच राज्यातील एकनाथ शिंदे सरकार लव्ह जिहादविरोधात कडक कायदा आणण्याच्या विचारात आहे, असेही यावेळी महाजन यांनी सांगितले. असे प्रकार दिवसेंदिवस वाढत असल्याचे आपण पाहत आहोत आणि त्याविरोधात कठोर कायदा आणण्याचा विचार करत आहोत, असही महाजन म्हणाले. मात्र, सहाय्यक पोलीस आयुक्त (एसीपी) चंद्रकांत जाधव यांनी सांगितले की, या प्रकरणात ब्लॅकमेलिंग किंवा लव्ह जिहादसारखा कोणताही मार्ग अद्याप समोर आलेला नाही.
पोलिसांच्या तपासाकडे लागले लक्ष
पोलिसांचे तपासकार्य सुरू आहे आणि आरोपी शिझान आणि तुनिषाचे फोन ताब्यात घेण्यात आले आहेत अशी माहिती सहायक पोलीस आयुक्त(एसीपी) चंद्रकांत जाधव यांनी दिली आहे. तुनिषाच्या आत्महत्येनंतर अनेक तर्कवितर्क लढविले जात असले तरी पोलिसांनी तपासाची अधिकृत माहिती दिलेली नाही. शिझान खानची पोलीस कोठडी मिळाल्यानंतर पोलीसांच्या तपासात काय निष्पन्न होते, हे लवकरच समोर येईल. यामध्ये अनेक गोष्टींचा खुलासा होण्याची शक्यता आहे.