रावेर : रावेर तालुका हा महाराष्ट्र-मध्यप्रदेश सिमेवर आहे. मध्यप्रदेशातून रावेर मार्गे मोठ्या प्रमाणात अवैध गुरांची वाहतूक सुरु आहे. अनेकदा गोवंश तस्करीचे वाहने पकडली जातात, मात्र त्यांच्यावर कठोर कारवाई होत नाही. त्यामुळे गुरांच्या तस्करीचे प्रमाण वाढतच आहे. यामुळे सर्वसामान्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. याबाबत आमदार शिरीष चौधरी यांनी अधिवेशनात तारांकीत प्रश्न उपस्थित कारवाईची मागणी केली आहे.
नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात आमदार शिरीष चौधरी यांनी रावेर विधानसभेतील विविध प्रश्न तारांकीत उपस्थित केले. रावेर तालुक्यात मध्यप्रदेशातून गोवंश तस्करी होत असल्याचे अनेकदा उघडकीस आले आहे. या विषयाला आमदार शिरीष चौधरी यांनी अधिवेशनात वाचा फोडली आहे. गोवंश तस्करांवर कारवाई करण्याची मागणी आमदार चौधरी यांनी केली आहे. यावेळी त्यांनी रावेर तालुक्यातील पालमार्गे काही महिन्यांपूर्वी सुकी नदित फेकलेल्या २३ मृत गुरांचा संदर्भ देत यातील गोतस्करांवर कठोर कारवाईची मागणी केली. परिसरातून मोठ्या प्रमाणात अवैध गोवंश तस्करी होत असल्याने त्यांनी याबाबत कारवाईची मागणी केली.
या मुद्यांकडे वेधले लक्ष
जळगाव जिल्ह्यात प्रधानमंत्री मातृवंदना योजनेच्या सुमारे ५ हजार ५५० महिला लाभार्थ्यांचे सुमारे २ कोटी ७५ लाख रुपये अनुदान प्राप्त झालेल झाले नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधून घेतले. यासोबत रावेर तालुक्यात १४ हजार जनावरांना लंम्पी या आजाराने १०९ जनावरांचा मृत्यू झाला. यावल व रावेर तालुक्यात पशुसंवर्धन विभागातील व पशुवैद्यकीय दवाखान्यातील अनेक पदे रिक्त आहेत. रावेर तालुक्यातील केळी पिक घेणाऱ्या सुमारे ८०० शेतकऱ्यांचे विमा योजनेचे लाखो रुपये विमा कंपनीकडून मिळाले नाही. राज्यातील १४,९८५ शाळांवर टांगती तलवार आहे आदी मुद्दे त्यांनी उपस्थित केले.
गायरान जमिनीवरील अतिक्रमणाचा मांडला मुद्दा
दरम्यान, रावेर तालुक्यातील गायरान जमिनीवर बेकायदेशीर अतिक्रमण केलेल्या अतिक्रमणधारकांना अतिक्रमण काढून घेण्याबाबत त्यांनी मुद्दा उपस्थित केला. तालुक्यातील तांदळवाडी येथील १०५ प्रकल्पग्रस्तांच्या कुटुंबे नवीन गावठाणात पुनर्वसन प्लॉट मिळण्याबाबत. रावेर नगरपालिका हद्दीत सन २०२२-२३ ते २०२५-२६ ही चतुर्थ कर आकारणी हद्दीतील व हद्दी बाहेरील मालमत्तेची अवास्तव कर आकारणी केली जात असल्याबाबत आमदार शिरीष चौधरी यांनी प्रश्न उपस्थित करत कारवाईची मागणी केली आहे.