जळगाव : प्रहार जनशक्ती पक्ष हा विशेषत: ग्रामीण भागातील कष्टकरी जनतेत रुजलेला आहे. जळगाव जिल्ह्यात या पक्षाचा फारसा प्रभाव नव्हता. मात्र, प्रहार जनशक्तीचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी यांनी प्रहारमध्ये प्रवेश घेताच पक्षाचे वातावरण तयार होऊ लागले आहे. मोठ्या संख्येनं लोक पक्षाशी जुळत आहेत. याचाच फायदा म्हणून नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत प्रहार जनशक्तीने खाते उघडले आहे. त्यामुळे आगामी काळात प्रस्तापित नेत्यांसमोर ‘प्रहार’च्या रुपात एक नवे आव्हान उभे ठाकले आहे.
रावेर मतदारसंघातील सावखेडा बु ग्रामपंचायत निवडणुकीत प्रहार जनशक्ती पक्षाने बाजी मारली असून, या ठिकाणी प्रहार जनशक्ती पक्षाचे सत्ता स्थापन झाले आहे. येथील नवनिर्वाचित सरपंच रवींद्र महाजन (बखाल) व सदस्यांनी आज अनिल चौधरी यांच्या भुसावळ येथील निवासस्थानी भेट घेतली असता त्यांचा सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
नवनिर्वाचित सरपंच, सदस्यांचा सत्कार
या वेळी नवनिर्वाचित लोकनियुक्त सरपंच रवींद्र महाजन (बखाल) व सदस्य तुषार नारायण चौधरी, चेतन राजेंद्र महाजन, संगीता अनिल बकाल, मीना राजू तडवी, फातेमा रोशन तडवी, सीमा नितीन चौधरी, हलीमा रमजान तडवी व प्रहार शेतकरी जिल्हाध्यक्ष सुरेश चिंदू पाटील, जिल्हा उपाध्यक्ष गणेश बोरसे, अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष रावेर वसीम शेख व इतर मान्यवर उपस्थित होते.
अनिल चौधरींच्या नेतृत्वाचा पक्षाला फायदा
जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात प्रहारची झालेली एंट्री ही राजकीय पक्षांना धक्का देणारी असणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत प्रहार मारलेली मुसंडी आगामी राजकारणात आपले स्थान घट्ट करणारी आहे. पक्षाचे नेते अनिल चौधरी यांचा मतदार संघात दांडगा जनसंपर्क आहे. त्यामुळे आगामी काळात प्रहार जनशक्ती पक्षाची कामगिरी सरस ठरणार आहे.