पुणे : प्रेयसीसोबत संसार थाटण्यासाठी एका 65 वर्षीय वृध्दाने 45 वर्षीय इसमाला भुलवून शेतात नेले. तेथे त्याचे कोयत्याने मुंडके तोडून खून केला. तसेच मृताची ओळख पटू नये म्हणून मृतदेहाला स्वत:च्या अंगावरील कपडे घालून ट्रॅक्टरला जोडलेल्या रोटर मिशनमध्ये फिरवत त्याचे तुकडे केले. त्यानंतर स्वत:च्याच मृत्यूचा बनाव केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुभाष उर्फ केरबा छबन थोरवे (वय 65, रा.चऱ्होली) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. तर रविंद्र भिमाजी घेनंद (वय 48) असे मयत व्यक्तीचे नाव असून निखील रविंद्र घेनंद (वय 28, रा. धानोरे, ता. खेड) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. संशयित सुभाष थोरवे याचे एक महिलेसोबत प्रेमसंबंध होते. त्याला प्रेयसीसोबत दूर कोठे तरी जाऊन रहायचे होते. यासाठी त्याला त्याच्याच मृत्यूचा बनाव करायचा होता.
पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न
सुभाष थोरवे याने महिलेसोबत मिळून रविंद्र घेनंद यांना विश्वासात घेऊन आपल्या शेतात बोलावले. नंतर कोयत्याने त्यांचे मुंडके कापले, मृतदेहाच्या अंगावर स्वतःचे कपडे घातले. तसेच शेतातील रोटर मशीनमध्ये मृतदेह घालून तो फिरवला व हा अपघात असल्याचा बनाव केला. तसेच मृतदेहाचे मुंडके, कोयता व अंगावरचे कपडे लपवून ठेवत पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. आळंदी पोलिसांनी याबाबत आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. मृत शरीराचे शीर नसल्याने पोलिसांचा तपास सुरु होता. अधिक तपास केला असता संशयित थोरवे हा शेलपिंपळगाव येथे रात्री जिवंत आढळला आणि पोलिसांना धक्काच बसला. पोलिसांनी तातडीने त्याला ताब्यात घेतले.
नातेवाईकांनी अंत्यविधी देखील केले
सुभाष थोरवे रात्री उशिरापर्यंत घरी आले नाही म्हणून नातेवाईकांनी शोध घेतला असता शेतामध्ये मृतदेह दिसला. मृतदेहाच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला होता. विनाशीर मृतदेह सुभाष थोरवे याचाच असावा, असे समजून तो नातेवाइकांच्या ताब्यात दिला. त्यानंतर नातेवाइकांनी विधिवत अंत्यविधी केले आणि दशक्रियाविधीही पार पडला होता.