मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची आज आर्थर रोड तुरुंगातून सायंकाळी पाच वाजता सुटका झाली. तब्बल एक वर्ष, एक महिना आणि 2७ दिवसांनी अनिल देशमुख आर्थर रोड तुरुंगातून बाहेर आले. त्यांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, जयंत पाटील, छगन भुजबळ, सुप्रिया सूळे आणि अनिल देशमुख यांचे कुटुंबीय तुरुंगाबाहेर उपस्थित होते.
अनिल देशमुख यांना दहा दिवसांपूर्वीच जामीन मंजूर करण्यात आला होता. तथापि, सीबीआयने त्याविरोधात दाद मागितल्यामुळे दहा दिवसांची स्थगिती न्यायालयाने स्वतःच्या आदेशाला दिली होती. ही मुदत संपल्यानंतर पुन्हा सीबीआयने मुदतवाढ मागितली. मात्र, न्यायालयाने ही मागणी फेटाळली. त्यामुळे देशमुख यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला होता.
कार्यकर्त्यांनी केला जल्लोष
अनिल देशमुख यांचे आम्ही स्वागत करत आहोत. त्यांची आज सुटका होत आहे. कोणत्याही आरोपाविना त्यांना तेरा महिने तुरुंगात रहावे लागले. त्यांच्यावरील आरोप सिद्ध झाले नाहीत. पण कोर्टाने न्याय केला, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी दिली. दरम्यान, देशमुख यांच्या सुटेकदरम्यान जयंत पाटील, सुप्रिया सुळे तुरुंगाबाहेर उपस्थित होत्या. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. त्यांच्या स्वागताचे बॅनर्सही झळकले.