जळगाव : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बाहेर पडून आपला वेगळा गट स्थापन केला. यामुळे जळगाव जिल्ह्यातही शिवसेनेत दोन गट निर्माण झाले आहेत. आता शिंदे गटाकडून आगामी निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी केली जात आहे. त्यादृष्टीने शिलेदार नियुक्त करुन, त्यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
बाळासाहेबांची शिवसेना पक्षाची जिल्ह्याची कार्यकारणीची घोषणा करण्यात आली आहे. शिवसेना सचिव संजय मोरे यांनी हि नियुक्ती केली आहे. शिंदे गटाच्या जळगाव ग्रामीण व जळगाव शहर जिल्हाप्रमुखपदी निलेश पाटील यांचे नियुक्ती करण्यात आली आहे. जळगाव विधानसभा शहर संघटक म्हणून श्याम कोगटा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कुंदन काळे व गणेश सोनवणे हे जळगाव शहर प्रमुख असणार आहेत. तर ऍड.दिलीप पोकळे, मनोज चौधरी, गिरीश कोळी, नवनाथ दारकुंडे, हर्षल मावळे हे जळगाव उपशहर प्रमुख असणार आहेत.
महिला जिल्हा संपर्क प्रमुखपदी माळी
डॉक्टर खुशाल जावळे यांची वैद्यकीय आघाडी प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली असून जितेंद्र गवळी हे श्रीकांत शिंदे वैद्यकीय फाउंडेशनचे जिल्हाप्रमुख असणार आहेत. महिला जळगाव जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून सरिता माळी कोल्हे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर शोभा चौधरी आणि ज्योती शिवदे जळगाव शहर प्रमुख असणार आहेत.
जिल्ह्यातील स्थानिक नियुक्त्या पुढच्या टप्प्यात होणार
जिल्हाभरात गेल्या अनेक दिवसापासून शिंदे गटाच्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या वतीने कार्यकारणी नियुक्त अद्यापपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या नव्हत्या. मात्र नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याची प्रमुख कार्यकारिणी जाहीर करण्यात आलेली आहे. एकूण सात पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या मुंबईतून जाहीर झालेल्या आहेत. मात्र जिल्ह्यातील स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या पुढील टप्प्यात करण्यात येणार असल्याची विश्वसनीय माहिती समोर आली आहे.