जळगाव: जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून, नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. पाचोरा तालुक्यातील दुसखेडा या गावात धक्कादायक घटना समोर आली आहे. भरदिवसा एका दरोडेखोराने ८७ वर्षीय वृध्दाला चाकूचा धाक दाखवून हातपाय बांधून घरातील कपाटातून ६ लाखाची रोकड आणि ३० ग्रॅम सोन्याचे दागिन्यांचा मुद्देमाल जबरी लूट केली. या घटनेमुळे पाचोरा तालुक्यात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाचोरा तालुक्यातील दुसखेडा येथे एकनाथ पांडू पाटील (वय-८७) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. गुरुवारी २९ डिसेंबर रोजी दुपारी १.३० सुमारास त्यांचा मुलगा शेतात कामाला असताना तर घरातील महिला गल्लीत एका महिलेकडे पापड बनवण्याचे काम करताना व्यस्त होते. त्यामुळे वृध्द बाबा हे घरात एकटेच पलंगावर झोपलेले होते.
आजोबांचे हातपाय बांधून केली चोरी
दुपारी दीड वाजेच्या सुमारास एक दरोडेखोर त्यांच्या घरात घुसला. त्यावेळी त्याने हाताला मोजे आणि तोंडाला रूमाल बांधलेला होता. पलंगावर झोपलेले असतांना बाबांन उठविले. चाकूचा धाक दाखवून त्यांच्या तोंडाला रूमाल बांधला व मागच्या घरात घेवून गेला. त्यानंतर तिथे बाबांचे हातपाय बांधले व बाजूच्या पलंगावर ढकलून दिले.
सहा लाखांचा मुद्देमाल लंपास
दरोडेखोराने गोदरेज कपाटातील ५ लाख रुपयांची रोकड आणि ३० ग्रॅम सोन्याचे दागिने असा एकूण अंदाजे ६ लाख ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोबारा केला. दुपारी अचानक घडलेल्या घटनेमुळे पाचोरा तालुक्यात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पाचोरा पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी दाखल झाले आहेत.