मुंबई: पोस्ट ऑफिसच्या अल्पबचत योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना नवीन वर्षात सरकारकडून गिफ्ट मिळाले आहे. मोदी सरकारने अल्पबचत योजनेवरील व्याजदरात वाढ केली आहे. यामध्ये जानेवारी ते मार्च या कालावधीत काही योजनांचे दर वाढवण्यात आले आहेत. पीटीआयच्या म्हणण्यानुसार, सरकारने शुक्रवारी पोस्ट ऑफिस मुदत ठेवी, एनएससी आणि ज्येष्ठ नागरिक बचत योजनेवरील व्याजदर 1.1 टक्क्यांपर्यंत वाढवले आहेत. ही वाढ 1 जानेवारीपासून लागू होणार आहे.
नुकत्याच झालेल्या व्याजदरांच्या अनुषंगाने सरकारने ही वाढ केली आहे. मात्र, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) आणि सुकन्या समृद्धी योजनेच्या व्याजदरात बदल करण्यात आलेला नाही.
आता किती मिळणार व्याज?
नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (NSC) वर 1 जानेवारीपासून सात टक्के दराने व्याज मिळणार आहे. या सरकारी योजनेवर सध्या 6.8 टक्के व्याज आहे. त्याचप्रमाणे, ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) वर सध्याच्या 7.6 टक्क्यांऐवजी आठ टक्के व्याज मिळणार आहे. पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट स्कीम म्हणजेच एक ते पाच वर्षांच्या FD वरील व्याजदर 1.1 टक्क्यांनी वाढतील. आता पोस्ट ऑफिसमध्ये एक वर्षाची एफडी उघडल्यावर 5.5 टक्क्यांऐवजी 6.6 टक्के व्याजदर मिळेल. त्याच वेळी, पोस्ट ऑफिसमध्ये दोन वर्षांच्या मुदत ठेवींवर 5.7 टक्क्यांऐवजी 6.8 टक्के दराने व्याज दिले जाईल. दुसरीकडे, दोन वर्षांच्या पोस्ट ऑफिस एफडीवरील व्याजदर 5.8 टक्क्यांवरून 6.9 टक्के करण्यात आला आहे. पोस्ट ऑफिसमध्ये पाच वर्षांच्या टॅक्स सेव्हिंग एफडीवरील व्याज 6.7 टक्क्यांवरून 7.0 टक्क्यांवर पोहोचले आहे.
किसान विकास पत्रावर अधिक लाभ मिळेल
दुसरीकडे, पोस्ट ऑफिसच्या मासिक उत्पन्न योजनेत 6.7 टक्क्यांऐवजी आता 7.1 टक्के दराने व्याज मिळणार आहे. तर, पोस्ट ऑफिसच्या किसान विकास पत्र (KVP) योजनेत 1 जानेवारी 2023 पासून 7.0 टक्क्यांऐवजी 7.2 टक्के दराने व्याज मिळेल. या योजनेत जमा केलेली रक्कम पहिल्या 123 महिन्यांत मॅच्युअर होत असे. आता ही रक्कम 120 महिन्यांत मॅच्युअर होईल. केंद्र सरकारने या अल्पबचत योजनांवरील व्याजदरात बराच काळ कोणताही बदल केलेला नाही. अशा परिस्थितीत अल्पबचत योजनेतील गुंतवणूकदारांसाठी नवीन वर्ष हे सरकारकडून नवीन वर्षाच्या भेटीसारखे आहे.