पुणे : चाळीत राहणाऱ्या तरुणीने प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून त्याच चाळीत राहणाऱ्या काही तरुणांनी या तरुणीला ठार मारण्याचा प्रयत्न केला. येरवड्यातील मच्छी मार्केट परिसरात हा प्रकार घडला. येरवडा पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जय अँथोनी, अनिकेत जगन्नाथ काकडे, गणेश जगताप आणि सोनू उर्फ रॅडो अशी आरोपींची नावे आहेत. हे सर्व आरोपी पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. 20 वर्षीय तरुणीने या प्रकरणी तक्रार दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आळंदीत केला प्रेमविवाह
पीडित तरुणी आणि आरोपी येरवडा परिसरात एकाच भागात राहतात. काही दिवसांपूर्वी फिर्यादी तरुणीने एका तरुणासोबत आळंदीत प्रेमविवाह केला होता. याचाच राग आरोपींच्या मनात होता. रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास आरोपींनी या तरुणीला धमकी देऊन हातातील धारदार हत्यार तिच्या डोक्यात मारण्यासाठी उगारले. परंतु फिर्यादीने हाताने वार अडवल्याने ती थोडक्यात बचावली.
केस पकडून लाथाबुक्क्यांनी मारहाण
यावेळी इतर आरोपींनी तरुणीचे केस ओढून तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर आरोपींनी हवेत कोयता फिरवून परिसरात दहशत निर्माण केली. येरवडा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून चारही आरोपींना अटक केली.