नवी दिल्ली : 2023 या नववर्षाचा आज पहिलाच दिवस. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी इंधन कंपन्यांनी ग्राहकांना झटका दिला आहे. कंपन्यांनी 1 जानेवारी 2023 पासून एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत बदल करण्याचा निर्णय घेतला. कंपन्यांनी घरगुती सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल केलेला नाही. परंतु कमर्शिअल सिलिंडरच्या किंमतीत 25 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
दरवाढीनंतर दिल्लीत कमर्शिअल सिलिंडरची किंमत 1769 रुपये झाली आहे. तर कोलकात्यात आता कमर्शिअल सिलिंडर 1870 रुपयांना मिळेल. मुंबई बद्दल सांगायचं झालं तर या ठिकाणी कमर्शिअल गॅस सिलिंडरची किंमत 1721 रुपये आणि चेन्नईत ही किंमत 1917 रुपये झाली आहे.
वर्षभरात 153 रुपयांची वाढ
घरगुती सिलिंडरच्याबाबतीत बोलायचं झालं तर त्यात 6 जुलै 2022 रोजी इंधन कंपन्यांनी 50 रुपयांची वाढ केली होती. गेल्या एका वर्षात घरगुती सिलिंडरच्या किंमतीत 153.50 रुपयांची वाढ झाली आहे. महिन्याच्या पहिल्या दिवशी इंधन कंपन्या समीक्षा करतात आणि एलपीजी सिलिंडरच्या किंमती बाबत निर्णय घेतात. महिन्याच्या पहिल्या तारखेला सिलिंडरच्या किंमतीत वाढ अथवा घट होत असते. 2022 मध्ये घरगुती सिलिंडरच्या किंमतीत चार मोठे बदल पाहायला मिळाले आहेत. यात मोठी वाढ करण्यात आली होती. यावेळीही महिन्याच्या पहिल्या दिवशी घरगुती सिलिंडरच्या किंमतीत वाढ करण्यात आली नसली तर कमिर्शिअल सिलिंडरच्या किंमतीत वाढ करण्यात आली आहे.