नाशिक : नाशिक शहरापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या मुंढेगाव एमआयडीसीतील जिंदाल कंपनीत रविवारी सकाळी भीषण आग लागल्याची घटना घडली. बॉयलरचा स्फोट झाल्याने ही आग लागल्याचे समोर आले आहे. गेली 3 तास इथे स्फोट होत असल्याची प्राथमिक माहिती आहे. या आगीमध्ये 35 कामगार जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असली, तरी आगीत कितीजण अडकले याबाबत नेमका आकडा समोर आलेला नाही. घटनास्थळी मुख्यमंत्री आणि पालकमंत्री घटनास्थळी भेट देणार असल्याची शक्यता आहे.
नाशिक-मुंबई महामार्गावर असलेल्या गोंदे गावाजवळ जिंदाल कंपनीचा प्लांट आहे. या प्लांटमध्ये आज बॉयलरचा मोठा स्फोट झाला. स्फोटाची तीव्रता इतकी भीषण होती की आजूबाजूच्या 20 ते 25 गावांमध्ये आवाज ऐकू आला. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल व पोलीस अधिकाऱ्यांसह ग्रामस्थांनी त्या ठिकाणी तातडीने धाव घेतली. कंपनीत साधारण 2000 कर्मचारी कामाला असल्याची प्राथमिक माहिती आहे. स्फोटाच्या घटनेत काही कर्मचारी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यानंतर अडकलेल्या कामगारांची सुटका करण्यासाठी अग्निशमनल दलाच्या 14 गाडया दाखल झाल्या असून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
बचावकार्यात प्रशासनासमोर अनेक अडचणी
आग लागलेल्या शाफ्ट जवळ अवघ्या 150 मीटर अंतरावर मोठी इंधन टॅंक आहे. या मोठ्या टाकीत, जवळपास 20 हजार डिझेल असल्याची माहिती समोर आली आहे. जिंदाल कंपनीतील डिझास्टर यंत्रणा माहिती असलेला एकही जबाबदार अधिकारी घटनास्थळी नसल्याची माहिती समोर आली आहे. कंपनीतील आपत्कालीन यंत्रणेचा, माहिती नसल्यानं अद्याप कोणताही उपयोग झाला नाही. प्रचंड धूर झाल्याने, बचावकार्यात प्रशासनाला अनेक अडचणी येत आहे.
रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण
कंपनीतील केमिकल स्टोरेजला आग लागली आहे. या आगीत काही जण जखमी झाले आहेत. 11 जणांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यातील काही जणांची प्रकृती गंभीर आहे. औद्योगिक वसाहती नियमितपणे कामकाज सुरू असताना अचानकपणे सकाळी 11 वाजेच्या सुमारास ही आग लागली. या स्फोटाची तीव्रता इतकी होती की, आजूबाजूच्या घरातील खिडक्यादेखील हादरल्या. या घटनेमुळे आजूबाजूच्या भागातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अचानक लागलेल्या या आगीमुळे काही कामगार गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.